मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आहे. त्यांच्यासोबत एकूण 55 आमदारांनीही बंड केलं. त्यापैकी 40 आमदार हे शिवसेनेचे असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड हे केवळ ठाणे आणि मुंबई (mumbai) पुरतं मर्यादित नाही. तर राज्यव्यापी आहे. मात्र, तरीही शिवसेनेने केवळ मुंबईवरच फोकस केला आहे. शिवसेनेने (shivsena) केवळ मुंबईतच मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यव्यापी बंड असताना आणि अख्खा ठाणे जिल्हा हातातून जात असतानाही शिवसेनेने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बंडखोरांच्या जिल्ह्यात शिवसेनेकडे नेता नाहीये का? शिवसेनेला मुंबईच महत्त्वाची वाटत आहे का? केवळ मुंबईतच मेळावे घेण्यासाठी शिवसेनेची स्टॅटेजी नेमकी काय आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यात काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने बाकी असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या महापालिकेतील आमदारच शिवसेनेला सोडून गेले आहेत. मुंबईतील तीन ते चार आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. तर ठाण्यातून एकनाथ शिंदे, पालघरमधून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. त्यामुळे संघटनात्मक आणि आर्थिक रसद पुरवणाऱ्याच नेत्यांनी बंड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासह सहा आमदारांनी बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेसाठी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, या महापालिका नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. त्यातही मुंबई आणि ठाणे महापालिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेने या महापालिकांकडे सर्वाधिक लक्ष दिलं आहे. मात्र, राज्यव्यापी बंड झालेलं असतानाही शिवसेनेने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादमध्ये पक्ष सावरण्याची सर्वाधिक गरज असताना शिवसेनेने मुंबईतच मेळावे घेण्यावर भर दिल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबईत जे काही घडतं. त्याचा मेसेज देशात जातो. मुंबईतील आंदोलन आणि रॅलीचे पडसादही देशभर उमटतात. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत मेळावे घेण्यावर भर दिल्याचं सांगितलं जात आहे. या मेळाव्यातून देशभरात मेसेज देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन करून इतर जिल्ह्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यामागची ही स्टॅटेजी आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने मुंबईतील शिवसेना संघटन मजबूत करणं हा त्यामागचा हेतू असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळेही शिवसेनेने मुंबईवर भर दिला आहे. राज्यातील सत्ता केव्हाही हातातून जाऊ शकते. पण मुंबईतील शिवसेना हातून जाऊ नये यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.