हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून कसे लांब गेलेत, ते देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्यांमधून दाखवून दिलं. त्यांनी अत्यंत तिखट शब्दात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधी घेण्यात आलेल्या या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
“इतकी वर्ष हिंदू ह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनीनो म्हणून करायचे. उद्धव ठाकरे तुम्ही ज्या दिवशी राजकारणात आलात, त्या दिवसापासून, कालपर्यंत ही निवडणूक सुरु होण्याच्या आधीपर्यंत ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनीनो म्हणून भाषणाची सुरुवात करायचात. पण इंडिया आघाडीची मुंबईत पहिली सभा झाली, तेव्हापासून तुम्ही हिंदू म्हणण सोडलत. तुम्ही हिंदू म्हणण का सोडलत?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
‘जर, नकली कुठे म्हटलं जात असेल, तर ते इथे’
“हिंदू शब्द उच्चारण्याची लाज वाटते का? तुम्हाला भीती वाटते का, हे म्हटल्यावर ज्यांच्या शरणी गेलोय, ते नाराज होतील. म्हणून तुम्ही हिंदू म्हणण सोडलत. जर, नकली कुठे म्हटलं जात असेल, तर ते इथे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र आहात. कोणी नाही म्हणू शकत नाही. संपत्तीचा वारसा तुमच्याकडे आहे. पण विचारांचा वारसा उरलेला नाही. विचारांच्या वारशाला तिलांजली दिलीय. विचारांचा वारसा आता एकनाथ शिंदे चालवतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.