मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. त्यानंतर बंडखोर आमदारांना परतण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं आवाहन करण्यात आलं. तर दुसरीकडे कारवाईचा इशाराही देण्यात आला. मात्र, मागील 9 दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहेत. त्यातच सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) शिंदे गटातील आमदारांना कारवाईपासून 11 जुलैपर्यंत संरक्षण देण्यात आलंय. अशास्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आजची तातडीची मंत्रिमंडळ बैठक ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची बैठक ठरेल अशीही चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे हे पक्षातील बंडाळीनंतर दोन वेळा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं असं बोललं जातं. मात्र, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार बरखास्तीबाबत चर्चा होईल असं सांगितलं जातंय. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशीही दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.