शिवडीमधून अखेर अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अजय चौधरी हे मागच्या दोन टर्मपासून शिवडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजय चौधरी यांचं नाव नव्हतं. पण गुरुवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडली. त्यामध्ये अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागच्या काही दिवसांपासून शिवडीमधून विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? याची चर्चा रंगली होती. शिवडीमधून लालबाग राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी सुद्धा दावा केला होता. सुधीर साळवी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रीय आहेत. त्यांचा सुद्धा दांडगा जनसंर्पक आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून जिंकले. पण शिवडी विधानसभेतून त्यांना कमी मताधिक्क्य मिळालं. त्यामुळे अजय चौधरी यांना तिकीट मिळण्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. सुधीर साळवी यांनी शिवडी विधानसभेत संघटनात्मक बांधणी केली आहे. काल त्यांना तिकीट नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली. अजय चौधरी यांना ठाकरे गटाने तिकीट देण्यामागे निष्ठा हे सुद्धा एक कारण आहे. कारण दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली, त्यावेळी अजय चौधरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांना साथ दिली.
लालबाग-परळमध्ये परस्पर वेगळं चित्र
शिवडीतून ठाकरे गटाकडून अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर होताच, लालबाग परिसरात शाखेबाहेर शिवसैनिकांचा राग दिसून आला. ‘सुधीर भाऊ अंगार बाकी सब भंगार’च्या शिवसैनिकांकडून घोषणा देण्यात आल्या. ‘शिवडी आमच्या भाऊंची, नाही कुणाच्या बापांची’ अशाही आरोळ्या देण्यात आल्या. शेकडो कार्यकर्ते लालबाग शाखेबाहेर जमले होते. त्याचवेळी अजय चौधरी यांना तिकीट मिळाल्यामुळे परेल शाखेबाहेर उत्साह होता, गुलालाची उधळण करण्यात आली. म्हणजे लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात परस्पर वेगळं चित्र होतं.