Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. देशातील सर्वच पक्ष युती-आघाडी करुन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत आहेत. प्रमुख सामना हा NDA विरुद्ध INDIA आघाडीमध्ये होणार आहे. सध्या सर्वच पक्षांच पहिल प्राधान्य उमेदवार निश्चित करण्याला आहे. भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. भाजपाने महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवारी जाहीर केलेली नाही. कारण शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला नाही. संपूर्ण देशाची तुलना करता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच वेगळी आहे. कारण मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटले. यात एक गट सत्ताधारी आघाडीत आणि दुसरा गट विरोधी पक्षामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला असणार? यावरुन भविष्यातील राजकारणाच चित्र स्पष्ट होणार आहे.
जागावाटप निश्चित करण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज दुपारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत कोण कुठल्या जागेवरुन लढणार? हे जवळपास निश्चित झालं आहे. पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार का? हा मुद्दा आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात प्रकाश आंबेडकर समाधानी दिसलेले नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात एक वेगळी ताकद आहे. उमेदवार निवडणूक ते आणू शकत नसले, तरी उमेदवार पाडण्याची त्यांची ताकद आहे. त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणारी मत निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रकाश आंबडेकर सोबत हवे आहेत. पण अलीकडच्या काही दिवसातील त्यांची वक्तव्य पाहता हे मनोमिनिल होईल का? हा मुद्दा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आजच्या बैठकीला जाणार का? याकडे सगळ्यांच लक्ष असेल.
मविआत कोण किती जागांवर लढणार?
महाविकास आघाडीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. वंचितला 27 जागा सोडाव्यात असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे दिला होता, पण शरद पवार यांनी वंचित ला 5 ते 6 जागा देऊ शकतो असे सूतोवाच केले होते. उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेऊन 23 जागांचा प्रस्ताव दिला आहे, तर काल काँग्रेसने टिळक भवन येथे बैठक घेऊन 22 जागा संदर्भात चर्चा करून, 19 लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक ही घेतली आहे.