मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचा आज पाचवा दिवस आहे. शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून (Shivsena) सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन केलं जातंय. तर दुसरीकडे आमदारांवर कारवाईची तयारीही सुरु आहे. अशावेळी शिंदे गटात सहभागी असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. संकटकाळात पक्षानं कधी विचारपूसही केली नाही. पण शिवसैनिक म्हणूनच आपण जग सोडू, अशा शब्दात जाधव यांनी खंत व्यक्त केलीय.
यामिनी जाधव म्हणाल्या की गेल्या चार पाच दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो. पण आजही आम्ही शिवसैनिक आहोत, उद्याही शिवसैनिक असू, किंबहुना आम्ही शिवसैनिक म्हणूनच हे जग सोडू. यशवंत जाधव साहेब, 47 वर्षापासून शिवसेनेत आहेत. 17 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडचण, अनेकदा निवडणूक हरलो, पण कधीही त्यांनी वेगळा विचार केला नाही. गेले काही महिने, ऑक्टोबरपासून माझ्या आयुष्यात एक वादळ आलं, कॅन्सर नावाचं. माझ्या कुटुंबाला समजलं, पूर्ण कुटुंब तुटलं. कॅन्सर या आजाराची माहिती पक्षाला द्यावी लागते. ती माहिती यशवंत जाधव साहेबांनी पक्षातील प्रमुखांना दिली. एक महिला आमदार म्हणून मला अपेक्षा होती की माझे काही नेते घरी येतील. महिला आमदार कॅन्सरने ग्रस्त आहे, ही गोष्टच मोठी हादरवणारी होती. कॅन्सर या शब्दाने मी कोलमडून गेले होते. माझ्या कुटुंबाने, माझ्या मतदारसंघातील सहकाऱ्यांनी मला खूप साथ दिली. मी त्यांचे आजही आभार मानू इच्छिते.
अपेक्षा होती की माझी विचारपूस केली जाईल, एक आधाराची थाप जाधव कुटुंबांना मिळेल. पण तसं झालं नाही. किशोरीताई माझ्या घरी आल्या त्यांनी मला अनेक सूचना दिल्या. हे कर म्हणजे तुला बरं वाटेल.. पण मला अपेक्षा होती की नेते विचारतील. पण कोणत्याही नेत्याने माझी विचारपूसही केली नाही. मी स्वत: 2012 पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नीला कॅन्सर झालेला मी पाहिला, त्यांना भेटायला मी गेले होते. त्यांच्यासारखी माझी मरणासन्न अवस्था होणं गरजेचं होतं का? मग माझ्या पक्षातील नेते मला पाहण्यासाठी आले असते का? ही गोष्ट मनाला कुठेतरी खलत होती. त्यातच अनेक अडचणींचा सामना माझं कुटुंब करत आहे. पण कुणीही मार्गदर्शन, कुणाचाही आधार मिळत नाही. दोघेच हातपाय मारत आहोत. आणि मग या निर्णयाला येऊन पोहोचलो. ही सात आठ महिन्यातील प्रक्रिया आहे. मनाला यातना होत आहेत. पण एक मात्र नक्की की शिवसेना सोडून आम्ही कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही.
यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेसोबत बेईमानी कधीही करणार नाहीत, काहीतरी कारण त्यामागे असेल. शिवसैनिक ते समजून घेतील अशी अपेक्षा आहे, अशी भावनिक साद यामिनी जाधव यांनी शिवसैनिकांना घातली आहे.