अमरावती: राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ओला दुष्काळासारखी परिस्थिती राज्यात आहे. असं असताना शेतकरी आणि पूरग्रस्ताना अजूनही कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. राज्यावर संकट ओढवलेलं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत आहेत. गेल्या 26 दिवसातील त्यांची ही पाचवी दिल्लीवारी असणार आहे. त्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी खोचक टीका केली आहे. आज अख्खा महाराष्ट्र (maharashtra) बेवारस झाला आहे, राज्यातील जनतेचं सरकार मायबाप असते, मात्र या सरकारचा अजूनही ठाव ठिकाणा नाही, अशी बोचरी टीका माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ही टीका करतानाच पावसामुळे अमरावतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अमरावतीत ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ नेमायचं धाडस होत नाही. कोणतं खातं कुणाकडे आहे हे माहिती नाही. विविध करणांसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी सुरू आहे, कोण कुणाला ठकवतात ते जनतेला समजत नाही, पण महाराष्ट्राचे नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही. संपूर्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नाही, त्यामुळे पालकमंत्र्याविना जिल्हे पोरके झालेत. (दोन मंत्र्यांचं) राज्य सरकार शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष करीत आहे, असं सांगत ठाकूर यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेधही केला.
अमरावती जिल्हयामध्ये मागील आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीयशोमती ठाकूर यांनी केली आहे. तसेच शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत आणि सर्वसामान्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदनही त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना आज दिले.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहा:कार माजला आहे. गावा-गावात पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. शेती पाण्याखाली गेली, घराघरात पाणी शिरले, गुरेढोरे वाहून गेली आहेत. त्यामुळे या अतिवृष्टीचा तडाखा अमरावती जिल्ह्याला बसला असून शेतीसह घर, मालमत्ता आणि पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे दूरगामी परिमाण दिसून येत असून नुकसानी संदर्भातील पंचनामे तत्काळ करून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच नुकसान भरपाई देण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरीक व पशुधन पालकांना सरसकट मदत द्यावी. जिल्हयामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तुर, सोयाबिन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी व नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने जमीन खरवडून निघाली आहे. शेतीमध्ये मोठया प्रमाणात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामा करुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भिंतीची पडझड होत, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच सर्व सामान्यांना सरसकट मदत मिळवून द्यावी, असंही त्या म्हणाल्या. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेन्द्र जगताप, अमरावती शहर अध्यक्ष बबलु शेखावत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आदींचा समावेश होता. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.