यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपच्या उमेदवार भावना गवळी यांनी 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. भावना गवळी यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भावना गवळी यांनी आघाडी घेतली.
“आजचा हा विजय कार्यकर्ते तसेच नेत्याच्या विश्वासचा विजय असून सर्वांनी प्रामाणिकपने काम केल्याने हे यश मिळालं, अशी प्रक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली.
भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा, तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झाल्या आहेत. त्यामुळे भावना गवळी या शिवसेनेतील यंदा निवडून आलेल्या खासदारांपैकी सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदार ठरल्या आहेत. त्यामुळे भावना गवळी यांना मंत्रिपद मिळण्याची आशा यवतमाळ-वाशिमच्या नागरिकांना आहे. भावना गवळी यांच्या सलग पाचव्या विजयामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा यवतमाळ आणि वाशिममधील नागरिकांना आहे.
शिवसेनेचे अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे यांसारखे दिग्गज शिवसेना नेते आणि केंद्रात मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार पराभूत झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिकवेळा विजयी खासदार म्हणून भावना गवळी यांच्या नावाचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो.
यवतमाळमध्ये कुणाला किती मतं मिळाली?
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी एकूण 1 लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करुन, एकप्रकारे भावना गवळी या जायंट किलर ठरल्या आहेत.
दरम्यान, सलग पाचव्यांदा यवतमाळ-वाशिममधून जिंकलेल्या भावना गवळी यांना केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.