अहमदनगर : भारत जोडो यात्रेवरुन (Bharat Jodo Yatra) देशात रणकंदन सुरु आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) ही काँग्रेस जोडो यात्रा असल्याची घणाघाती टीका केली. एवढेच नाही तर राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) चालण्यासाठी कलाकार, सेलिब्रेटींना पैसा मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर भाजपने ही यात्रेचा हा ट्रेंड इनकॅश करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
भाजपने भारत जोडो यात्रेला कायम हिणवले. बोचरी टीका केली. यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असताना शेलकी भाषेत टीका केली, मग आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कशाला यात्रा काढत आहेत, असा खोचक सवाल थोरात यांनी विचारला आहे.
भारत जोडो यात्रेला दक्षिणेतून सुरुवात झाली. तेव्हापासून यात्रा चर्चेत आहे. यात्रेला प्रत्येक राज्यात अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तर या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे थोरात यांनी सांगितले.
ही केवळ काँग्रेसची यात्रा असल्याचा भाजपचा आरोप थोरात यांनी फेटाळून लावले. ही यात्रा एक विचार घेऊन चालली आहे. यात्रेत महागाई, बेरोजगारी, समाजातील ऐक्य अशा प्रश्नावर विचार मंथन सुरु असून लोकांमधून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
बावनकुळे यांना यात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण भारत जोडो यात्रेवर टिका करणाऱ्यांना आताच यात्रा काढण्याची आवश्यकता का पडली? यामागे भारत जोडो यात्रेला मिळणारा वाढता प्रतिसाद तर कारणीभूत नाही ना? असा चिमटा थोरात यांनी काढला.
भाजपच्या यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबतही थोरात यांनी बाजू मांडली. भाजपला काही करु द्यात, काँग्रेस मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.