आजचे राशी भविष्य 22nd August 2024 : पार्टनरसोबत फिरायला जाणं अंगाशी येईल… ही रास तुमची का?

| Updated on: Aug 22, 2024 | 7:30 AM

Horoscope Today 22nd August 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 22nd August 2024 : पार्टनरसोबत फिरायला जाणं अंगाशी येईल... ही रास तुमची का?
Horoscope
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 22nd August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

तुमच्या जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमचे मन प्रफुल्लित राहील. सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात तुमच्या क्षमता आणि कौशल्यांची प्रशंसा होईल. लोकांशी संवाद ठेवा. त्यांच्याशी संपर्क कायम ठेवा. आर्थिक प्रकरणात धीर धरा. भपका दाखवल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी अधिक ताण घेऊ नये. सीनिअर व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं.
व्यापारात आज महिलांसाठी विशेष शुभ संधी आहे. परंतु सध्या शेअर आणि तेजी-मंदीसारख्या गोष्टींमुळे गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ नाही. त्याबद्दल योग्य माहिती घेऊनच कोणताही निर्णय घ्या. घरचं वातावरण आनंदी राहील.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

या काळात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवहार कौशल्याने एखादं कार्य चांगलं मार्गी लावाल. तुमचं कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कर्ज घेताना तुमच्या क्षमतेचा विचार करा. अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊ नका. बिनकामाच्या गोष्टीत आज पैसा वायफळ खर्च होणार आहे. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. मालमत्तेसंबंधातील कागदपत्र अनुभवी व्यक्तीकडून तपासून घ्या. तुमची जीवनसाथी आणि तुमच्या कुटुंबातील लोक आज तुम्हाला भक्कम साथ देतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मित्राची भेट होईल. एखादं अशक्य काम अचानक पूर्ण झाल्याने मन आनंदून जाईल. तुमच्या अंगभूत गुणाची बाहेरच्या लोकांना माहिती देऊ नका. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबात सुरू असलेले वाद शांततेत सोडवा. बाहेरचा प्रवास करताना जपून राहा. आर्थिक खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायावर तुमचं नियंत्रण असेल, पण तुमच्या व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. नाही तर तुमच्या योजना लीक होतील. त्याचा तुम्हाला फटका बसेल. घर आणि व्यवसायात ताळमेळ ठेवा. प्रेम संबंधातील गैरसमज दूर होतील.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस सामान्य जाईल. अनेक महत्त्वाच्या लोकांशी संपर्क येईल. या भेटीचा तुम्हाला फायदाच होईल. आरोग्याची काळजी घ्या. दम लागल्यासारखं वाटेल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांच्या पदरी आजही निराशा लागेल. एखाद्या नोकर भरतीला जाल. पण तिथे धावल्यामुळे दमछाक होईल. व्यवसायात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख शांतीचं वातावरण राहील. मानसिक आणि शारिरीक थकवा दूर होईल. गावाकडे जाण्याचा योग आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून दूर राहा. शेअर मार्केटमध्ये बरकत येईल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुमच्या मेहनातीचं फळ आज मिळेल. अनेक कामे मार्गी लागतील. मालमत्तेची कामे योग्यवेळी पूर्ण करा. मित्र आणि शेजाऱ्यांसोबतचे संबंध मधूर राहतील. मुलांच्या करिअरचा विचार कराल. उत्साह आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही पुढे जाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज मोठा फायदा होणार आहे. घर बदलण्याची शक्यता आहे. पीजीत राहणाऱ्यांना दिवस कंटाळवाणा जाईल. नव्या नोकरीची ऑफर येईल. पार्टनरसोबत डेटला जाल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पण आज कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. नाही तर नुकसान होईल. व्यवसायात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. कलात्मक आणि ग्लॅमरशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. भागिदारीतील व्यवसायातही लाभ होईल. नोकरीतील आळशीपणामुळे अडचणी निर्माण होईल. नोकरीत केलेलं सिंडिकेट कामाला येणार नाही. बॉसच्या पुढे पुढे करण्यात अर्थ नाही. कामावर फोकस करा. प्रेम संबंधात तणाव येईल. त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. घरातील सर्व समस्या दूर होतील. आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे मनाला शांती मिळेल. अविवाहितांना लग्नाचा चांगला प्रस्ताव मिळेल. भावनिक होऊन आज कोणताही निर्णय घेऊ नका. नाही तर अडचणी वाढतील. कोर्ट कचेरीच्या कामात अडथळे येतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातूनच कोर्टाची कामे मार्गी लावा. आरोग्य चांगलं राहील. एखाद्या रोमँटिक ठिकाणी जाण्याचा प्लान बनवाल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

एखादा जुना वाद निर्माण झाल्यानंतर संयम राखा. जीभेवर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुम्हाला अनुकूल नाहीये. एकावेळी अनेक कामे हाती घेतल्याने तुमची धांदल उडणार आहे. व्यवसायातील सहकाऱ्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे तुमची अडचण वाढणार आहे. बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. आज एखादी नवी वस्तू खरेदी कराल. नवा सिनेमा पाहायला जाण्याची इच्छा होईल. गावाकडून एखादी खुशखबर येईल. जवळच्या नातेवाईकाकडून दु:खद बातमी ऐकायला मिळेल. लहान मुलात रमताना लहान होऊन जाल. पोटाचा विकार डोकं वर काढेल. एखाद्या अनोळखी जागेला भेट देण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल. आळस सोडून ऊर्जावान राहण्याची ही वेळ आहे. फाजिल आत्मविश्वास नडेल. तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक संबंधात वितुष्ट येईल. तुमच्या उद्योगात काय चाललं आहे, त्यावर अधिक लक्ष द्या. तुमच्या मागे तुमचे सहकारी काड्या करतील. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. एखादा सहकारी तुमच्याजवळ रोज गोंडा घालेल. आज एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरात शांतता राहील. गॅस आणि अपचनामुळे सांधेदुखीचा त्रास होईल. प्रेमात नकार मिळेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत. त्याची आज तुम्हाला प्रचिती येईल. प्रत्येक काम एकाग्रतेने करा. कुणाशीही संवाद साधताना नकारात्मक बोलणं टाळा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत फार टाईमपास करू नका. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन आयुष्याची घडी बसवा. गृहिणींसाठी आजचा दिवस चांगला आहे. महिलांच्या कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. नोकरदार महिलांना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हरवलेली वस्तू आज अचानक मिळेल. नवऱ्याचा सल्ला फलदायी ठरणार नाही. पार्टनरसोबत फिरायला जाणं अंगाशी येईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज शक्यतांचा दिवस आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक गावाला जाण्याचा योग आहे. अचानक खरेदी करण्याचाही योग आहे. यशस्वी होण्यासाठी स्वभावात थोडी स्वार्थीपणा आणण्याची गरज आहे. चुकीच्या कामात भाग घेऊ नका. नोकरदारांनी त्यांच्या कामामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नवरा बायकोंमधील संबंध मधूर असतील. हवामानाच्या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होणार आहे.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण टेवा. जुनी समस्या उद्भवल्याने वातावरण तणावपूर्ण होऊ शकेल. तरुणांनी त्यांच्या करिअरकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नोकरीच्या ठिकाणी नकारात्मक स्वभाव ठेवू नका. कमिशन, कन्सल्टन्सी आणि संगणकाशी संबंधित नोकरी करणाऱ्यांना आज महत्त्वाची बातमी मिळेल. डोळ्यांचा विकार जाणवण्याची शक्यता आहे. पोट खराब झाल्याने तुम्हाला वारंवार भूक लागल्यासारखं वाटेल. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)