मुंबई : शयनकक्ष ही अशी जागा आहे जिथे दिवसभराचा थकवा मिटवून तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते. वास्तूनुसार, (Bedroom Vastu Tips) वैवाहिक जीवन प्रेम आणि शांततेने जगण्यासाठी पती-पत्नीची बेडरूम खूप महत्त्वाची असते. अनेक जोडपी छोट्याशा घरातही मोठ्या प्रेमाने राहतात, तर अशी अनेक घरे आहेत, जिथे भरपूर ऐशोआराम असूनही पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात, मतभेद होतात. तुमच्या घरातही असे होत असेल तर परस्पर समन्वय वाढवण्यासोबतच तुमच्या बेडरूमच्या वास्तूकडेही लक्ष द्या. पती-पत्नीमध्ये दुरावा नसावा, त्यांच्या आयुष्यात आनंद असावा, यासाठी त्यांची बेडरूम योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याची दिशा, भिंतींचा रंग, आरसा, टॉयलेट, फर्निचर इत्यादी योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. या सर्वांच्या असंतुलनामुळे भांडणे, तणाव, आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
सुखी वैवाहिक जीवनाचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. त्यानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम भागात बेडरूम असणे शुभ मानले जाते. यामुळे पती पत्नीचे नाते घट्ट होण्यास मदत होते. घराच्या उत्तर-वायव्य भागात बेडरूम असल्यास पती पत्नीमध्ये प्रेम आणि आकर्षण वाढते. पश्चिम दिशा ही लाभाची मानली जाते, त्यामुळे या भागात बांधलेली बेडरूम दाम्पत्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नफा आणि संपत्ती मिळवण्यासाठी शुभ असते.
पती-पत्नीने खोलीत ईशान्य दिशेला बेड ठेवणे टाळावे. वास्तू शास्त्रानुसार ईशान्य दिशेचा स्वामी गुरु आहे, जो लैंगिक संबंधांमध्ये उत्साहाचा अभाव आणतो, ज्यामुळे वैवाहिक जीवन नीरस बनते आणि आपापसात समन्वयाचा अभाव देखील असतो. शयनकक्ष आग्नेय दिशेला असल्यामुळे पती-पत्नीचे वागणे विनाकारण आक्रमक होते आणि कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे हे नित्त्याचे होऊन जाते, त्यामुळे दोघांमध्ये मतभेद होतात. दोघेही फक्त एकमेकांचे दोष आणि उणीवा शोधण्यात गुंतलेले असतात, जे वेगळे होण्याचे कारणही बनू शकतात. यासोबतच या कोनात बेडरूम ठेवल्याने अनावश्यक खर्चही वाढतो.
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाप्रमाणेच मानवी शरीराचा मेंदूचा भाग हा त्याचा उत्तर ध्रुव मानला जातो. त्यामुळे संपूर्ण विश्रांतीसाठी तुम्ही नेहमी दक्षिण ध्रुवाकडे डोके ठेवून झोपावे जेणेकरून चुंबकीय लहरी योग्य दिशेने वाहू शकतील. याउलट उत्तर दिशेला डोके ठेवून झोपल्याने चुंबकीय प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तुमची झोप नीट होऊ शकत नाही. वास्तूनुसार या दिशेला डोके ठेवून झोपल्याने झोपेचा त्रास होतो ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
जे लोकं उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय ठेवून झोपतात, असे लोक रात्रभर कड बदलत राहतात, झोपेतून उठल्यानंतरही आळस कायम राहतो. सकाळी मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे वास्तूनुसार कधीही या दिशेला डोके ठेवून झोपू नका. वास्तूनुसार नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपा, त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य आणि चांगली झोप मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)