धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातून (Tuljabhawani Temple Fraud) देवीचे सोन्याचे मुकूट आणि चार मौल्यवान सोन्याचे ऐतिहासीक दागिने गहाळ झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली होती. मंदीर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीतांवर येत्या चार ते पाच दिवसांत गुन्हे दाखल होणार आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार आहे. यासाठी विधी विभागाचा कायदेशीर सल्ला मागितला गेला आहे.
महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातून देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र देखील गायब करण्यात आले. सोन्याचा मुकुट, मंगळसुत्र, नेत्रजोड, माणिक मोती यांचा गहाळ झालेल्या दागिन्यांमध्ये समावेश आहे. चोरीला गेलेल्या मुकूटाचे वजन 826 ग्राम म्हणजे पाऊण किलो पेक्षा जास्त आहे. ज्याची किंमत आजच्या तारखेत 41 लाखांपेक्षा जास्त आहे. हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुरातन खडावा (पादूका) काढून त्याजागी नवीन बसवण्यात आल्या.
दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय 1 किलो 268 ग्राम वजनाची 289 पुतळ्या असलेली 3 पदरी शिवकालीन माळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे.
तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोण कोणती नावे समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सर्व गैरप्रकार कोणाच्या आशिर्वादाने तर होत नव्हता ना? असा प्रश्नही या निमित्त्याने निर्माण होत आहे.