मुंबई : आज अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) आहे. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजपासून गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. यासोबतच अक्षय तृतीयेसोबतच उत्तराखंडमध्ये चारधाम यात्राची (Char Dham Yatra 2023) औपचारिक सुरुवात होणार आहे. गंगा माताची पालखी शुक्रवारी दुपारी 12:15 वाजता मुखबा येथून रवाना झाली. ती आज गंगोत्री धाममध्ये पोहोचेल. यावेळी लष्कराची 11 वी बटालियन जेकलाई आर्मी बँड माता गंगेच्या पालखी सोबत चालत आहे.
शुक्रवारी देवी गंगोत्रीच्या या पालखी यात्रेत देश-विदेशातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. या पालखीचे नेतृत्व माता गंगा यांचे भाऊ समेश्वर देव करत होते. आज दुपारी 12.35 वाजता वैदिक मंत्रोच्चाराने गंगोत्री धाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. तर यमुनोत्री धामचे दरवाजे दुपारी 12.41 वाजता उघडले जातील. यमुनोत्री धाम सध्या बर्फाच्छादित आहे. तिथे अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे वाटेत निसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंगोत्री धाममध्येही पाऊस पडत आहे. या पाऊस आणि बर्फवृष्टीचा भाविकांच्या उत्साहावर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी शेकडो भाविक उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जातील. जे सध्या गंगोत्री आणि यमुनोत्री धामला पोहोचले आहेत, तेच भाविक 3 दिवसांनी केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथला रवाना होतील.
या वर्षीच्या चार धाम यात्रेसाठी देशभरातील 15 लाखांहून अधिक भाविकांनी त्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. ही नोंदणी मोफत असून याद्वारे सरकार भाविकांची संख्या आणि त्यांच्या सुविधांवर लक्ष ठेवते. या प्रवासासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश हे बेस कॅम्प मानले जातात. सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून शेकडो भाविक ऋषिकेशला पोहोचले असून त्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीनंतर भाविक आपापल्या वाहनाने गंगोत्री-यमुनोत्रीकडे रवाना होतील.