नवी दिल्ली: सूर्यग्रहणानंतर आता या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) लागणार आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी म्हणजे पुढच्याच आठवड्यात हे चंद्रग्रहण लागणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहण भारतात सगळीकडे दिसणार नाही. भारताच्या (india) काही भागातच दिसणार आहे. भारतात चंद्रग्रहण दिसल्याने सूतक काळही मान्य होणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ (sutak kal) ग्रहण लागण्याच्या 9 तास आधी लागतो आणि ग्रहण संपताच सुतक काळही संपतो.
2022 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यापूर्वी दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण लागलं होतं. सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण लागणार आहे.
2022 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी लागलं होतं. 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. त्या दिवशीच हे ग्रहण लागणार आहे. वर्षातलं हे शेवटचं अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.
चंद्रग्रहणावेळी सूर्याच्या परिक्रमेदरम्यान पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते. यावेळी पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो. पूर्ण चंद्रग्रहणावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येतात. यावेळी आपण पृथ्वीवरून जेव्हा चंद्र पाहतो तेव्हा काळाकुट्ट दिसतो.
भारतात 8 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी संपेल. अशावेळी चंद्रग्रहणाचा सुतक काळ सकाळी 9 वाजून 21 मिनिटाने सुरू होईल.
तसेच संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटाने समाप्त होईल. वर्षाचं हे शेवटचं चंद्रग्रहण मेष राशीत लागेल.
चंद्रग्रहण प्रामुख्याने उत्तर पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर, हिंद महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या अधिकतर भागात दिसणार आहे. तर दक्षिण-पश्चिम युरोप आणि आफ्रिका खंडात चंद्रग्रहण दिसणार नाही.
भारतात पूर्ण चंद्रग्रहण केवळ भारताच्या पूर्वेकडील भागातच दिसेल. कोलकाता, सिलिगुडी, पटना, रांची, गुवाहाटीमध्ये वर्षाचं अखेरचं चंद्रग्रहण दिसेल.