मुंबई : सनातन धर्मात चातुर्मास (Chaturmas 2023) अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना आणि भक्ती करण्यात जातो. विविध नियम पाळले जातात. ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाहीत तर एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात. भगवान विष्णू ज्या वेळेला योगनिद्रामध्ये मग्न असतात त्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशी आणि देवउठी एकादशी दरम्यानचा काळ म्हणजे चातुर्मास असतो.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी विश्रांतीसाठी जातात. यावर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी येत आहे. दुसरीकडे, देवउठी एकादशीला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. यासोबतच 4 महिन्यांपासून थांबलेली शुभ कार्ये सुरू होतात. 2023 मध्ये देवउठी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. श्रावण महिन्यात अधिक मास असल्याने या वर्षी श्रावण महिना 2 महिन्यांचा तर चातुर्मास 5 महिन्यांचा असेल. म्हणजेच शुभ कार्य करण्यासाठी 1 महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)