हिंदू धर्मात छठ महापर्वाला खूप महत्त्व आहे. छठ महापर्वाची यंदा सुरुवात पाच नोव्हेंबरला स्नान करून झालीये. तर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन थेट महापर्व समाप्त होईल आणि त्यानंतर महिला उपवास पूर्ण करतील. छटपूजेच्या चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि त्यासोबतच छठ उत्सवाची समाप्ती होते.
छटपूजा मुख्यतः सूर्य देव आणि छठ मैया यांच्या उपासनेचा सण आहे. या काळात 36 तासांचा निर्जली उपास केला जातो. ज्या दरम्यान फक्त मावळत्या आणि उगवत्या सूर्याची पूजा करतात. अशी मान्यता आहे की सूर्य देवाच्या आशीर्वादाने माणसाला निरोगी आयुष्य प्राप्त होते. आणि छठी मैयाच्या आशीर्वादाने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्त होते. मुलांच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने अनेक इच्छित मनोकामना पूर्ण होतात.
तिथीनुसार गुरुवार सात नोव्हेंबर रोजी छटपूजेचा सण साजरा केला जाणार आहे. छटपूजा पूर्ण करण्यासाठी सात नोव्हेंबरला सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल आणि आठ नोव्हेंबरला सकाळी अर्घ्य दिले जाईल. आठ नोव्हेंबरला सूर्योदय सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी होईल. सूर्योदय झाल्यानंतर उपवास सोडता येईल.