मुंबई: दिवाळी आलीये! सगळीकडे रोषणाई, फराळाची तयारी, खरेदी सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिवाळीचा चांगलाच उत्साह आहे. दिवाळी हा सण आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांचा हा सण घरोघरी आनंद, उत्साह घेऊन येतो. दिवाळी 5 दिवसांची असते. खरं तर दिवाळी चांगलीच 15 दिवस साजरी केली जाते ती गोष्ट वेगळी पण महत्त्वाचे 5 दिवस! या सणाला सुरुवात होते धनत्रयोदशी पासून. यंदा लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरला आहे आणि धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने- चांदी खरेदी केले जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते.
विशेषत: लोक या दिवशी सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. सनातन धर्मात धनत्रयोदशी दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भांडी किंवा इतर घरगुती वस्तू खरेदी करणे फायदेशीर ठरते. बरं मग खरेदी करायचं म्हणजे कधीही खरेदी केली जाते का? नाही. असं म्हणतात की या दिवशी खरेदी करण्याला सुद्धा मुहूर्त असतात. या शुभ मुहुर्तावेळीच या गोष्टी खरेदी करायला हव्यात. शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास संपत्तीत तेरा पटीने वाढ होते. चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीला खरेदी आणि पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे.
जर तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही धनत्रयोदशीला म्हणजेच 10 नोव्हेंबरला दुपारी 2.35 ते 6.40 या वेळेत या वस्तू खरेदी करू शकता. यात तुम्ही हवं ते खरेदी करू शकता विशेषतः सोने, चांदी, भांडी, झाडू किंवा घरगुती वस्तू. तुम्हाला जर धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करता आल्या नाही तर तुम्ही त्या 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत खरेदी करू शकता. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनंतर त्रयोदशीची तिथी संपेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव, कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा तुम्ही 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 06 वाजून 02 मिनिटांपासून ते 08 वाजून 34 मिनिटांपर्यंत करू शकता. या दिवशी सोने, चांदी, भांडी, मालमत्ता, वाहने, पुस्तके, दागिने इत्यादी खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ समृद्धी प्रदान करतात.