मुंबई: गणरायाचा आगमन उत्साहात होत आहे. गणपतीच्या काळात भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं. मुंबईत या काळात भाविकांची दिवस रात्र गर्दी असते. भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, गृहरक्षक दलाचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा दल सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवा दरम्यान होणारी तुफान गर्दी, त्यात असणारा महिलांचा समावेश पाहता प्रशासनाकडून काही निर्णय घेण्यात आलेत. गणपतीचे दहा दिवस रात्री सुद्धा तुफान गर्दी, हे सगळं लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे काही मागण्या केल्यात. आता लहान मुले, महिलांच्या सुरक्षेची सुद्धा विशेष काळजी घेण्यात येणारे. गणेशोत्सवादरम्यान मध्यरात्री रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची मागणी केलीये.
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी गर्दी विभागण्यासाठी विशेष लोकलची मागणी केलीये. यामध्ये चर्चगेटहून विरार आणि सीएसएमटी हून कल्याण या लोकल मध्यरात्री उशिरा चालवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आलीये असं रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. दादर, चिंचपोकळी, करी रोड, भायखळा या स्थानकांमध्ये गणेशोत्सवादरम्यान प्रचंड गर्दी असते. या परिसरामध्येच लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा हे गणपती असल्यामुळे ही गर्दी दहा दिवस तितकीच असते. मध्यरात्री उशिरा लोकल चालवण्याने ही गर्दी विभागली जाऊ शकते म्हणून रेल्वे पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आलीये.
रेल्वे पोलिसांनी आरपीएफ, होमगार्ड आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतलीये. यावेळी या बैठकीत काही जिथे गर्दी असेल अशा महत्त्वाच्या स्थानकांवर सुरक्षा यंत्रणांच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये. या रेल्वे स्थानकांमध्ये सीएसएमटी, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, दादर, कुर्ला, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे यांचा समावेश आहे. या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीवर भर दिला गेलाय. याशिवाय बॉम्ब शोध-नाशक पथक आणि श्वान पथकाच्या साहाय्याने गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाणारे.