मुंबई: देशभरात ठिकठिकाणी गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन सुरु आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. गणपती म्हणजे लहान मुलांचा पक्का मित्र. लहान मुलांना बाप्पाची भारी आवड, दहा दिवस घरात नुसता किलबिलाट असतो. गणेशोत्सव काळात घरात लहान मुलांचाच गोंधळ जास्त असतो. त्यांना अनेक प्रश्न पडतात, ते बाप्पाविषयी खूप प्रश्न विचारतात. जर घरात गणपती बाप्पा बसवला जात नसेल तर ते हट्ट करून बसवायला लावतात, घरात गणपती आणायला लावतात. आपण सुद्धा या काळात लहान मुलांचे व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ बघतो. विसर्जनावेळी सुद्धा हीच लहान मुलं बाप्पाला सोडायला तयार नसतात, रडतात सुद्धा. मुलं ही देवाघरची फुलं असतात हे आपण नेहमी ऐकत आलोय. ही देवाघरची फुलं कधी काय प्रश्न विचारतील याचा काय नेम नसतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक चिमुकली तिच्या पप्पांना प्रश्न विचारतेय.
हा व्हिडीओ बघा. या व्हिडीओ मध्ये तुम्हाला एक छोटीशी गोंडस मुलगी दिसेल. पाऊस पडतोय त्यामुळे ही चिमुकली रेनकोट घालून उभी आहे. रेनकोट घालून ही छोटी हात जोडून उभी आहे, समोर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती आहे. आपल्याला व्हिडीओ बघताना वाटतं की आता ही मुलगी बाप्पासमोर कुठलीतरी प्रार्थना म्हणेल पण तसं होत नाही. ही मुलगी खूप गोंडसपणे विचारते, “रेनकोट कुठंय त्याचं?”. हा प्रश्न ऐकून तिचे बाबा सुद्धा हसू लागतात. ती हा प्रश्न इतका सहज विचारते तिथे आपल्यालाही वाटतं, लहानपण देगा देवा! कारण इतकी निरागसता फक्त लहान वयातच येऊ शकते.
असा प्रश्न कोणत्याच मोठ्या व्यक्तीला पडणार नाही. हा प्रश्न फक्त आणि फक्त लहान मुलांनाच पडू शकतो. भर पावसात जेव्हा ही मुलगी तिच्या गणू बाप्पाला भिजताना बघते तेव्हा तिला खूप काळजी वाटते. तिने स्वतः रेनकोट घातलेला असतो. आता लहान असली तरी तिला माहितेय की पावसापासून बचाव करण्यासाठी आपण हा रेनकोट घातलाय. मग बाप्पाने रेनकोट का नाही घातला? बाप्पाला पाऊस लागत नाहीये का? बाप्पाला सर्दी होत नाही का? त्याचं डोकं भिजत नसेल का? असे अनेक प्रश्न या चिमुरडीला पडले असतील. तिने कसलाही विचार न करताना बाबांना हा प्रश्न विचारला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.