मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या गणेश भक्तांची आज काळजी मिटली. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं (Ganesh Chaturthi) जल्लोषात स्वागत केलं. ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन झालं. बाप्पाच्या आगमनाचं हे विलोभनीय चित्रं केवळ मुंबई-पुण्यातच (mumbai pune) नव्हे तर चांद्यापासून बांद्यापर्यंत दिसत होतं. राज्यभर बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण राज्यातील रस्ते मिरवणुकीने भरून गेले होते. अबाल वृद्ध आणि महिला वर्ग या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. पारंपारिक वेशभूषा करून भाविक या मिरवणुकांमध्ये सामिल झाले होते. गणपत्ती बाप्पा मोरया (ganesh Chaturthi festival), आले रे आले गणपती आले… अशा घोषणाही यावेळी दिल्या जात होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि चैतन्य निर्माण झालं होतं.
मुंबईत आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं. गेली दोन वर्षे कोविड संसर्ग निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर मर्यादा होती. पण आता सर्व निर्बंध हटवले गेल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन होतंय. गणेशोत्सवात जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजलांय. पहाटे 4 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आलीय. त्यानंतर पहाटे 5.30 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आलेय, अशी माहिती लालबाग राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
अंधेरीचा राजा म्हणून प्रसिद्ध बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून आज दुपारी 1 च्या नंतर बाप्पाचे दर्शन सुरू होणार आहे. अंधेरीच्या राजाची 1966 साला स्थापना करण्यात आली आहे. तेव्हा पासून हा राजा नवसाला पावतो अशी आख्यायिका गणेश भक्तात आहे. आज पहिल्या दिवशी 11.30 ते 12.20 वाजता विधिवत पूजा करून 12.30 ते 1 वाजेपर्यंत आरती आणि 1 च्या नंतर गणेशभक्तांसाठी बापांचे दर्शन खुले होणार आहे.
प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचा गाभारा फुलांनी सजवला आहे. भाविक लांबून लांबून आज सिद्धिविनायक चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पहाटे 5 वाजता काकड आरती झाली. यावेळी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गाभाऱ्यात भक्तिमय वातावरण झालं होतं. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर गणेश भक्त जल्लोषात दिसत आहे.
भाद्रपद गणेश चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श करण्याची मुभा असते. 150 वर्षातून ही प्रथा सुरू आहे. वर्षातून एकदाच भाविकांना ही संधी मिळते. गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. पहाटे 4.30 पासून ते दुपारी 12.30 पर्यंत भाविकांना या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीत कुठेही घरी गणपती आणला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी सुरू केलेली प्रथा आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली आहे. दगडूशेठ गणेशोत्सवाचे यंदाचे 130 वे वर्ष आहे. शिवाय कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षाने गणपती उत्सव साजरा होत असल्याने पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली आहे. श्री पंचकेदार मंदिरात यंदा बाप्पा विराजमान होणार आहे. 11:37 वाजता श्री महेशगिरी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा झाली. दुपारच्या सुमारास होणार संस्थान गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी औरंगाबादमधील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नागपूरच्या राजाची सकाळीच पूजा करण्यात आली. मंत्रोचारणेसह बाप्पाच्या स्थापनेला सुरवात झाली. नागपूरचा राजा नागपूरकरांचं दैवत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते.आज विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना करण्यात आली. नागपूरचा राजाला दर वर्षी सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात येते. यंदाही ही परंपरा कायम आहे.
लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्त कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत दाखल व्हायला सुरवात झाली आहे. गणेश फक्त सहकुटुंब कुंभार गल्लीत येत आहेत. वाद्याच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्ततेमुळे बाप्पाचं घरोघरी आगमन होताना दिसत असून भाविकही जल्लोष करताना दिसत आहेत.