मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : दरवर्षी प्रमाणे यंदाही लालबागचा राजाला प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल झाले आहेत. अगदी कर्जत आणि कसाऱ्याहूनही अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. काही जण तर कुटुंबकबिल्यासह आले आहेत. त्यामुळे लालबागचा राजा मंडळ परिसर गर्दीने फुलून गेला आहे. या परिसरात एवढी गर्दी झालीय की उभंही राहता येत नाही. विशेष म्हणजे मुंबईत पावसाच्या अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, तरीही लालबागच्या परिसरातील गर्दीमुळे अनेकजण घामाघूम होतानाही दिसत आहेत.
गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, लालबागचा राजा मंडप परिसरातील गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. उलट दिवसे न् दिवस ही गर्दी वाढताना दिसत आहे. गर्दी इतकी प्रचंड आहे की दर्शनासाठी रांगेत उभं राहिल्यावर नंबर कधी येईल याची काहीच शाश्वती देता येत नाहीये. त्यामुळे भाविकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
आज सकाळी एक तरुणी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला चक्कर आल्याने ती कोसळली. त्यामुळे इतर भाविकांनी लगेच धावून जात तिची मदत केली.
ही तरुणी बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. गर्दीत उभं असताना तिचे पाय दुखायला लागले. अचानक तिला दरदरून घाम फुटला. तिला गरगरायला लागलं. भोवळ आली आणि ती कोसळली. तिच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या महिलांनी आणि पुरुषांनी तिला लगेच सावरलं.
तिला बाजूला बसवलं. तिचा घाम पुसला. काही लोकांनी तिला वारा घालायला सुरुवात केली. तर काहींनी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला पाणी प्यायला नेलं. या तरुणीवर तात्काळ उपचार करण्यात आले. तिची प्रकृती चांगली आहे. मात्र, अचानक झालेल्या या प्रकाराने भाविकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी काही भाविकांनी सकाळपासूनच रांग लावली आहे. तर काही भाविक रात्रीपासून रांगेत आहेत. अनेकजण रिकाम्या पोटी रांगेत उभे राहतात. पोटात काही नाही, त्यात गर्दीमुळे प्रचंड घाम येत असल्याने या भाविकांना गरगरल्यासारखं होतं.
गर्दीत तास न् तास उभं राहिल्यामुळेही या भाविकांना गरगरल्या सारखं होतं. त्यामुळे पोटात काही तरी टाकूनच दर्शन रांगेत उभं राहण्यास सांगितलं जात आहे. सोबत पाण्याची बॉटल आणि बिस्किट ठेवण्याच्याही सूचना दिल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे.