VIDEO : कुणाचे ऊर भरून आले, तर कुणाचा कंठ दाटला; लालबागचा राजाचं असं झालं विसर्जन

| Updated on: Sep 29, 2023 | 10:52 AM

गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर लालबागचा राजाचे विसर्जन करण्यात आले. तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक गिरगाव चौपाटीवर जमले होते.

VIDEO : कुणाचे ऊर भरून आले, तर कुणाचा कंठ दाटला; लालबागचा राजाचं असं झालं विसर्जन
lalbaugcha raja ganpati
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : गुलालांची उधळण… ढोलाचा दणदणाट… भक्तीभावाने बेधूंदपणे नाचणारे भाविक… कधी वरुणराजाची कृपा… तर कधी ऊन्हाचं पांघरूण… तब्बल 22 तासांपासून लालबागचा राजाची मिरवणूक निघाली. लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत (ganpati visarjan lalbaugcha raja) हेच चित्र सर्वत्र दिसत होतं. संपूर्ण लालबाग ते गिरगाव चौपाटीचा परिसर भक्ती आणि शक्तीने, उत्सव आणि उत्साहाने फुलून गेला होता. बघावे तिथे गर्दीच गर्दी दिसत होती. भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. गिरगाव चौपाटीवर आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना कुणाचे ऊर भरून आले होते, तर कुणाचा कंठ दाटून आला होता. पुढच्या वर्षी लवकर या… असं सांगताना अनेकांना भरून आलं होतं.

10 दिवस लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे. लालबागचा राजाची काल सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणूक निघाली. बाप्पाची आरती घेऊन या मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोलताशांच्या दणदणाटात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यावेळी हजारो भाविक जमले होते.

गुलालाची उधळण करत आणि ढोलाच्या तालावर ठेका धरत भाविक मिरवणुकीत तल्लीन झाले होते. अनेक भाविक तर कुटुंबकबिल्यासह आले होते. यावेळी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर अधूनमधून पावसाची बरसात होत होती. वरुणराजाचा कृपाप्रसाद घेतघेतच ही मिरवणूक आपल्या डौलाने निघाली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघाली होती. यावेळी पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मार्गातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

तो क्षण आलाच…

तब्बल 22 तास मिरवणूक काढल्यानंतर अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला पोहोचला. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीला येताच एकच जयघोष करण्यात आला. लालबागच्या राजावर फुलांची उधळण करण्यात आली. राजाची मिरवणूक येताच गिरगाव चौपाटीवरील भाविकही बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झाले. त्यानंतर हळूहळू ही मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघाले. बाप्पाला तराफात बसवले. त्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. शेवटची आरती घेण्यात आली. ही आरती घेताना अनेकांचा कंठ दाटून आला.

जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली… बाप्पाला कोळी बांधवांच्या स्वाधिन करण्यात आले… तेव्हा अनेकांना गलबलून आले. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले… अनेकांनी बाप्पाला हात उंचावून निरोप दिला… काही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत होते. तर काहीजण केवळ हातजोडून बाप्पाच्या भव्यदिव्य मूर्तीकडे टक लावून पाहत होते. मनात घालमेल सुरू होती, डोळ्यातून अश्रू वाहत होते.

जड पावलांनी घराकडे

जसजसा बाप्पा खोल समुद्रात जाऊ लागला, तस तशी मनाची घालमेल वाढली. बाप्पाचे विसर्जन होताच अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, नकळत हात डोळ्यांकडे अश्रू पुसण्यासाठी वळले. कोणत्याही विघ्ना शिवाय बाप्पाचं विसर्जन ganpati visarjan lalbaugcha raja झालं होतं. पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला होता. तर भाविक जड पावलांनी घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यांवर कमालीची शांतता पसरली होती.