पुणे | 29 सप्टेंबर 2023 : गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक गणरायाचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळाले. भाविकांनी हे देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. पुणे शहरात महत्व असलेल्या मानाचे पाचही गणपतीची विसर्जन झाले. त्यानंतर पुणेकरांचे नव्हे तर देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेत्यांप्रमाणे सेलिब्रेटीज मंडळींनीही हजेरी लावली होती.
पुणे शहरात कोयता गँगचा बिमोड पुणे पोलिसांनी कसा केला, यावर विसर्जन मिरवणुकीत देखावा करण्यात आला होता. पुण्यातील कोयता गँगची चर्चा राज्यभर झाली होती. पुणे पोलिसांनी या कोयता गँगवर धडक कारवाई करत अनेकांना अटक केली. काही जणांवर मकोका लावला. ही सर्व दृश्य विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यातून साकारण्यात आली होती.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10 वाजता सुरु झाली होती. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक गेल्या 21 तासांपासून सुरु आहे. रात्री 12 वाजेनंतर थांबलेला डीजेचे दणदणाट सकाळी 6 वाजताच पुन्हा सुरु झाला आणि पुण्यातील तरुणाईने ठेका धरला. शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून अद्याप ही गणपती मंडळांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. अखिल मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी अलका टॉकीज चौकात दाखल झाली.
गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक दुपारी 4 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर आली. यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्याची घोषणा मंडळाने यापूर्वीच केली होती. त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8.50 वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणूक श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला.