मुंबई : सध्या मुंबईत गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह आहे. घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सार्वजनिक मंडळांमधील भव्य गणेशमुर्ती आणि देखावे चर्चेचा विषय असतात. दक्षिण मुंबईतील परेल, लालबाग आणि गिरगाव हे भाग गणेशोत्सवाच मुख्य केंद्र आहेत. या भागात अनेक मोठी मंडळ आहेत. इथल्या सार्वजनिक मंडळातील गणरायाच्या दर्शनासाठी भाविक लांबून येतात. ‘लालबागच्या राजा’ची ख्याती देशभरात आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागमध्ये येत असतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. लालबागच्या राजाच भव्य रुप डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी, अभिनेते असे सर्वच जण लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात.
नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दरबारात इच्छापुर्ती होते. म्हणून लांबून, लांबून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शनिवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. अमित शाह हे दरवर्षी लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. यंदाही ते येणार आहेत. अमित शाह यांचा मुंबई दौरा हा फक्त काही तासांचा असेल. अमित शाह दुपारी 2 च्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतील. तिथून निघाल्यानंतर ते लालबागच्या राजाच दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जातील.
कसा असेल दौरा?
वर्षावरुन निघाल्यानंतर अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास मुंबई विद्यापीठातील एका व्याख्यानमालेला हजर राहतील. त्यानंतर पावणेआठच्या सुमारास पुन्हा दिल्लीला रवाना होतील. अमित शाह यांच्या मुंबईत दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार नाहीयत. फक्त देवदर्शन आणि ठराविक राजकीय गाठीभेटी होतील.