अक्षय तृतीया साजरी (Celebrate) करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत, अनेक कथा (Stories) आहेत. आख्यायिकांमधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं कळून येतं आणि म्हणून हा दिवस हिंदू (Hindu) धर्मात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. अशीच एक आख्यायिका आहे देवी अन्नपूर्णेच्या जन्माची. या आख्यायिकेत देवी अन्नपूर्णेचा जन्म कसा झाला ते सांगितलंय. एके दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला. शंकर भगवान म्हणाले कि भौतिक जग म्हणजे आभास आहे त्याला काय फारसं महत्त्व नाही. अगदी माणूस जे अन्न ग्रहण करतो ते सुद्धा. देवी पार्वती भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणारी देवी होती. भगवान शंकराचं भौतिक जगाला कमी लेखनं पार्वतीला आवडलं नाही. हे ऐकून देवी पार्वतीला खूप राग आला, भगवान शंकर आणि संपूर्ण जगाला भौतिक गोष्टींचं महत्त्व पटवून देण्यासाठी देवी पार्वती गुप्त झाली आणि म्हणाली की,“माझ्याशिवाय जग कसं टिकाव धरते तेच मला बघायचे आहे”.
देवी पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांनी त्याच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली. देवांवरसुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती, त्यांनाही कुठेही अन्न मिळाले नाही. याच दरम्यान अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी पार्वतीने अन्नपूर्णा बनून पृथीवर जन्म घेतला. याचकारणामुळे देवी अन्नपूर्णेला पार्वतीचा अवतार म्हटले जाते. देवीला आपल्या मुलांना होणारा त्रास बघवला नाही म्हणून देवी अन्नपूर्णेने वाराणसीत स्वयंपाकघर बनवले. भगवान शंकरांना समजलं की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे. तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे.
शंकर अन्नाची याचना करण्यासाठी काशीला गेले. हे स्वयंपाक घर त्यांची पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती. तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती. मोजकेच दागिने घातले होते. ती एका सिंहासनावर बसली होती आणि पृथ्वीवरील भुकेलेल्या लोकांना अन्नाचे वाटप करत होती. अन्नपूर्णेने भगवान शंकराला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि त्यांच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू शकला असला तरीही त्याचे भक्त तसे करू शकले नाहीत.
या अन्नपूर्णेच्या जन्मामुळे भगवान शंकरांना भौतिक गोष्टींचं महत्त्व कळले.