कधी आहे कार्तिक पौर्णिमा? पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व काय ? घ्या जाणून

| Updated on: Nov 14, 2024 | 10:38 AM

कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात अशी मान्यता आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते.

कधी आहे कार्तिक पौर्णिमा? पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व काय ? घ्या जाणून
दिवा (फोटो-फ्रीपिक)
Follow us on

दिवाळी नंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान केले जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी बरेच लोक उपवास करतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. त्यासोबतच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य दिले जाते.

कार्तिक पौर्णिमा कधी असते? कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दान करण्याचा मुहूर्त, जाणून घेऊया.

कार्तिक पौर्णिमा मुहूर्त

15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. या दिवशी पहाटे ४.५८ ते ५.५१ पर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे. त्या दिवशीचा शुभमुहूर्त आणि अभिजीत मुहूर्त सकाळी ११.४४ ते दुपारी १२.२७ पर्यंत आहे. त्या दिवशी व्यतिपात योग सकाळी ७.३० मिनिटापर्यंत आहे. कार्तिक पौर्णिमेला भरणी नक्षत्र असून सकाळपासून रात्री ९.५५ पर्यंत आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र असते. कार्तिक पौर्णिमेला सूर्योदय सकाळी ६.४४ ला होईल.

स्नान आणि दान वेळ

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा उत्तम मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त. यावेळी आंघोळीनंतर आपल्या क्षमतेनुसार दान केले जाते. ज्यांना ब्रह्म मुहूर्तावर स्नान करता येत नाही त्यांनी सूर्योदयानंतर स्नान करावे. गंगा स्नान करण्याची संधी नसेल तर घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे.

या वस्तूंचे करा दान

कार्तिक पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तुम्ही अन्न, वस्त्र, फळे इत्यादी दान करू शकता. चंद्राचे शुभ फल प्राप्त करायचे असेल तर कार्तिक पौर्णिमेला तांदूळ, दूध, साखर, चांदी, पांढरे वस्त्र, पांढरे मोती, पांढरे चंदन, इत्यादींचे दान करावे.

कार्तिक पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ

कार्तिक पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ दुपारी ४.५१ आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रास्ताची वेळ नसते.

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेला देवी देवता काशीला येऊन भगवान शंकरांची पूजा करतात आणि या ठिकाणी दिवे लावले जातात. या कारणास्तव या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)