उद्यापासून सुरू होणार महाकुंभमेळा, जाणून घ्या पहिल्या शाही स्नानाचा मुहूर्त आणि महत्त्व

| Updated on: Jan 12, 2025 | 5:43 PM

प्रयागराज मध्ये उद्यापासून महा कुंभमेळा सुरू होणार आहे. उद्या पहिले शाही स्नान होणार आहे. या महा कुंभामध्ये देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. शाही स्नान करण्याआधी त्याचा शुभमुहूर्त आणि नियम माहिती असणे आवश्यक आहे.

उद्यापासून सुरू होणार महाकुंभमेळा, जाणून घ्या पहिल्या शाही स्नानाचा मुहूर्त आणि महत्त्व
Kumbh Mela
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रयागराज येथे उद्यापासून महा कुंभमेळा सुरू होणार आहे. हिंदू धर्मात प्रयागराज मध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. इथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी महा कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते. साधू संत आणि भक्त या पवित्र स्थानांवर होणाऱ्या महान उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. असे म्हणतात की महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात.

पहिल्या शाही स्नानाचा मुहूर्त

पौष पौर्णिमेच्या दिवशी महा कुंभाचे पहिले शाही स्नान होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार 13 जानेवारी रोजी पहाटे 05: 03 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 जानेवारी रोजी 3: 56 मिनिटांनी संपेल.

ब्रह्म मुहूर्त- पहाटे 5.27 ते 6.21 पर्यंत असेल.

विजय मुहूर्त- दुपारी 2:15 ते 2:57 पर्यंत असेल.

संध्याकाळ- संध्याकाळी 5.42 ते 6.09 पर्यंत असेल.

निशिता मुहूर्त- रात्री 12:03 ते 12:57 पर्यंत असेल.

शाही स्नानाच्या इतर तारखा

प्रयागराजमध्ये आयोजित महा कुंभाचे उद्या पहिले शाही स्नान होणार आहे. इतर शाही स्नानाच्या तारखा देखील सांगण्यात आल्या आहेत.

मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025

मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025

वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025

माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025

महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025

शाही स्नान करण्याचे नियम

महा कुंभात शाही स्नान करण्याचे काही खास नियम आहेत. महा कुंभामध्ये नागा साधू हे प्रथम शाही स्नान करतात. नागा साधूंची प्रथम स्नान करण्याची परंपरा ही शतकानूशतके चालत आली आहे. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गृहस्थाश्रमी लोकांसाठी महाकुंभातील स्नानाचे नियम वेगळे असतात. गृहस्थांनी नागा साधूंचे स्नान झाल्यानंतरच संगमावर स्नान करावे. स्नान करताना पाच डुबकी घ्या. तरच स्नान पूर्ण मानले जाते. हे स्नान करताना साबण किंवा शाम्पू वापरू नका. कारण ते पवित्र पाणी दूषित करणारे मानले जाते.

शाही स्नानाचे महत्त्व

शाही स्नान म्हणजे मनातील अशुद्धता दूर करणारे स्नान. शाही स्नानाच्या दिवशी संगमांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. एवढेच नाही तर शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीला या जन्मातील तसेच मागील जन्मातील पापांपासून देखील मुक्ती मिळते. महा कुंभात शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)