मुंबई : हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्त्येकाच्याच पत्रिकेत शुभ आणि अशुभ योग भविष्यातील घटनांचे कारण बनतात. पत्रिकेतील ग्रहांची अशुभ स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करतात. असाच एक योग म्हणजे कालसर्प योग (Kalsarpa Yoga). जेव्हा व्यक्तीच्या पत्रिकेत राहू पहिला आणि केतू शेवटचा ग्रह असतो तेव्हा काल सर्प योग तयार होतो. याउलट राहू खालच्या स्थितीत बसला असेल तर कालसर्प दोषही निर्माण होतो. कालसर्प योगाचा संबंधीत व्यक्तीवर वाईट परिणाम होईल की नाही हे पूर्णपणे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील ग्रह नक्षत्रांवर अवलंबून असते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत हा दोष आढळतो त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी त्यांनी लवकरच काही उपाय योजावेत जेणेकरून हे दोष दूर होतील. नागपंचमीच्या दिवशी हे उपाय केल्यास अधिक फलदायी ठरते. यावेळी नागपंचमी (Nag Panchami 2023) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच उद्या 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. कसे ते जाणून घेऊया.
नाग देवता हे भगवान भोलेनाथांच्या गळ्यात वास करणाऱ्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. नागपंचमी सोमवार, 21 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी नाग देवतेसह महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यात जल अर्पण करावे. त्यानंतर दुधाने अभिषेक करावा. शिवलिंगावर आणि नागदेवतेवर बेलपत्र आणि पांढरे फुल वाहावे. पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष दूर करण्यासाठी नाग आणि नागीन यांची जोडीने पूजा करावी. यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळतेच शिवाय संपत्ती आणि धन-धान्यात वाढ होते.
जर एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी. सकाळी 5.53 ते 8.30 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावे. तसेच नागपंचमीच्या दिवशी कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचू नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)