तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये (Pnadharpur wari 2022) एकादशीचा मोहत्त्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्याने भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी 24 तास दर्शन (24 hours dharshan) व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभे राहून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारतीपर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते.त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळं दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्यासाठी दर्शन बंद राहणार असून, उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे.
पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय महानाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती देखील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यंदा आषाढी वारीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीनं निमंत्रण दिलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा होणार आहे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सध्या सुरू आहे. ही पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे सरसावत असतात. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यामध्ये ग्लोबल शेपर या संस्थेचा उपक्रम स्तुत्यपूर्ण आहे. पालखी सोहळ्यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणावर चालत असतात. या सोहळ्यात महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न देखील प्रामुख्याने उद्भवत असतो. अशा वेळी महिलांना सॅनिटरी पॅडची व्यवस्था ग्लोबल शेपर या संस्थेकडून केली जात आहे. ही संस्था महिलांना सॅनिटरी पॅड देत आहे तसंच मासिक पाळी दरम्यान हे पॅड बदलण्याची व्यवस्था देखील या ग्लोबल शेपर संस्थेकडून करण्यात आली आहे. ही संस्था चालवण्याचं काम शरद पवार यांची नात देवयानी पवार करत आहेत. देवयानी पवार यांना त्यांचे सहकारी देखील या कार्यात मदत करत आहेत.