मुंबई, पौष अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यावर्षी पौष अमावस्या (Pausha Amavasya) 23 डिसेंबर म्हणजेच आज आहे. ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. धनुसंक्रांती पौष महिन्यात येते आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. या महिन्यात शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य आहेत, त्यामुळे या महिन्यात पितरांची पूजा आणि धार्मिक कार्य करण्याचा नियम आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रानुसार या महिन्याला ‘छोटा श्राद्ध पक्ष’ असेही म्हणतात. या महिन्यात तर्पण, पितरांसाठी पिंडदान, भगवान विष्णू आणि सूर्यपूजेलाही विशेष महत्त्व आहे. पौष अमावस्येचा शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.
उदयतिथीनुसार पौष अमावस्या 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज आहे. पौष अमावस्या तिथीची सुरुवात 22 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच काल संध्याकाळी 07.13 वाजता झाली आहे. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 03.46 वाजता संपेल.
या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. यानंतर देवघरात दिवा लावावा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशीही उपवास ठेवा. या दिवशी पितरांशी संबंधित कार्य करावे आणि पितरांसाठी पिंडदान करावे. भगवंताचे चिंतन करावे. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराचीही विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी गरीब लोकांना दान करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)