सोलापुरात राम नवमीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच रामलल्ला जल्लोष यात्रा काढण्यात आलीय. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.
पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी ही शोभायात्रा काढली होती. या रामलल्ला जल्लोष यात्रेला शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
गुलाल आणि गुलाब पुष्पाची उधळण करत या यात्रेला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वधर्मसमभावाचे असून या यात्रेत हिंदू, मुस्लिम, दलित समाजातील बांधव या रामलल्ला जल्लोष यात्रेत सहभागी झाले होते.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी या जल्लोष यात्राविषयीची माहिती सांगितली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिकी चौक मार्गे नवी पेठ परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली.
या यात्रेमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या यात्रेमध्ये लहान मुलांची संख्या देखील लक्षणीय होती. लहान मुले विविध वेशभूषा करून या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.