मुंबई | 1 जानेवारी 2024 : प्रचंड संघर्षानंतर अखेर अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर निर्माण झाले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या महासोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रामायण चर्चेत आलं आहे. रामानंद सागर यांनी बनवलेली रामायण सीरिअल पुन्हा चर्चेत आली आहे. 80 दशकात ही सीरिअल बनवण्यात आली होती. या सीरिअलमधील प्रत्येक व्यक्तीरेखा अविस्मरणीय होती. प्रत्येकाचं कामही अविस्मरणीयच होतं. अजूनही या सीरिअलसारखी सोडा पण त्या तोडीची सीरिअल झाली नाही. या सीरिअलमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या तेव्हाच्या मानधनाची आता चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेता अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. या दोघांची व्यक्तिरेखा इतकी गाजली की लोक त्यांच्याच फोटोंची पूजा करत होते. इतकी क्रेज या दोघांच्याबाबत होती. एवढेच नव्हे तर इतर कलाकारांनाही लोक रामायणातील व्यक्तिरेखेच्या नावानेच ओळखू लागले होते. आजही याच नावाने लोक त्यांना हाक मारतात. त्या कलाकारांचं खरं नाव आजही अनेक लोकांना माहीत नाहीये.
अरुण गोविल – अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत प्रभू रामाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांचा अभिनय प्रचंड जबरदस्त होता. हुबेहुब रामा सारखेच ते दिसत होते. त्यामुळे राम म्हणजे अरुण गोविल अशी प्रतिमाच लोकांच्या मनात ठसली होती. ती इतकी की लोकांनी त्यांची पूजा करणं सुरू केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार या व्यक्तिरेखेसाठी अरुण गोविल यांना त्याकाळी 40 लाख रुपये मानधन मिळालं होतं.
दीपिका चिखलिया – दीपिका यांनी या सीरियलमध्ये सीतेची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याकाळी दीपिका चिखलिया यांना या कामासाठी 20 लाख रुपये मानधन देण्यात आलं होतं. त्यांचीही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.
दारा सिंग – दारा सिंग हे अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये आधीच रुळले होते. त्यांनी रामायण मालिकेत हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांची ही भूमिका घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांना सर्वाधिक 35 लाख रुपये मिळाले होते.
सुनील लहरी – सुनील लहरी यांनी या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. लहरी यांची भूमिका छोटी होती. पण महत्त्वाची होती. या मालिकेसाठी त्यांना 15 ते 18 लाख रुपये मिळाल्याचा रिपोर्ट आहे.
अरविंद त्रिवेदी – राम आणि हनुमानानंतर रामायणात रावणाची भूमिका सर्वाधिक गाजली. रावणाची भूमिका ही या मालिकेचा केंद्रबिंदू होता. अरविंद त्रिवेदी यांनी या मालिकेत केवळ रावणाची भूमिका साकारली नाही तर त्यांनी ही भूमिका जिवंत केली. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. अरविंद त्रिवेदी म्हणजे रावण असं समीकरण त्याकाळी झालं होतं. या व्यक्तिरेखेसाठी त्यांना 30 लाख रुपये मानधन मिळालं होतं.