मुंबई : गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. गणपतीची मनोभावे आराधना केल्याने दु:खाचं निवारण होतं. त्यामुळे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन चतुर्थींचं खास महत्त्व आहे. प्रत्येक पंधरवड्यातील चतुर्थी ही लाडक्या गणरायाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजन केल्यास त्याचा लाभ होतो. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं संबोधलं जातं. तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हंटलं जातं.जुलै महिन्यातील संकष्टी 6 जुलै 2023 रोजी आहे. या दिवशीचं महत्त्व समजून भाविक मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणपती बाप्पाचं आराधना करतात. या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं. सूर्योदयापासून सुरु होणारा उपवास रात्री चंद्र दर्शनानंतर संपतो.
संकष्टीला विधीवत पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल आणि 7 जुलैला सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार संकष्टी 6 जुलैला असणार आहे. गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत असेल. तर उत्तम पूजा मुहूर्त काळ सकाळी 7 वाजून 11 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत असेल. संकष्टी चतुर्थीला चंद्राला अर्घ्य दिलं जातं. 6 जुलै रोजी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. यावेळेपासून चंद्राला अर्घ्य देता येणार आहे.
आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीवर भद्राचं सावट आहे. 6 जुलैला भद्रा सकाळी 5 वाजून 29 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेलव. ती पाताळात असल्याने तितका प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर पंचक दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 29 मिनिटांपर्यंत असेल.
सकाळी ब्रह्म मुहू्र्तावर उठून प्रातविधी उरकून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर गणपतीची मनोभावे पूजा करून संकल्प सोडा. आचमन करा आणि गणपतीच्या पूजेला सुरुवात करा. गणपतीला फुलं, हार, 21 दुर्वांची जुडी, शेंदूर आधी अर्पण करा. यानंतर मोदकांचा भोग लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून गणपती स्त्रोत, अथर्वशार्ष आणि व्रत कथा वाचा. पूजेत काही चूकभूल झाली असेल तर गणपतीची माफी मांगा. रात्री चंद्राला अर्घ्य देवून उपवास सोडा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)