मुंबई (मृणाल पाटील) : निवृत्तिनाथांचे (Nivruttinath Maharaj) जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे सांगितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये (Sanskrit) असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत (vithalpant) एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई.
त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले. त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनासे झाले पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत असा अख्यायिका आहे.
श्री निवृत्तिनाथ महाराज यात्रा
श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी निमित्त होणाऱ्या उत्सवामध्ये वारकरी बांधवांना आषाढीवारी पालखी सोहळ्यामुळे हजर राहता येत नसल्यामुळे श्री निवृत्तिनाथ महाराजांचा यात्रा उत्सव पौष वद्य ११ या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाची सुरूवात पौष वद्य ५ पासून होते व याची सांगता पौष वद्य १४ /अमावास्या या दिवशी होते. यामध्ये परंपरागतमान्यवरांची कीर्तने व जागर त्यांच्या ठरलेल्या दिवशी होत असतात.पौष वद्य १० दिवशी रात्री १२ वाजता संस्थान मार्फत पुजारी महाराजांची नित्य पूजा करतात. त्या नंतर त्रिंबकेश्वर नगर पालिकेतर्फे आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते.पौष वद्य ११ दिवशी दुपारी ४ वाजता महाराजांचा रथोत्सव होतो . महाराजांच्या पादुका श्री त्र्यंबकेश्वराच्या भेटीला नेल्या जातात. निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता नाथांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी नाशिकनगरी ओलांडून त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करतात. हाती टाळ-मृदुंगाचा निनाद आणि मुखी नाथांचे अभंग आळवीत पायी चालून हजारो वारकरी एकादशी निमीत्त हा उत्सव सोहळा साजरा करतात.
श्री संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर इतिहास
श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांची समाधी शके १२१९ पासून आहे. तेव्हापासून त्या समाधिची पूजार्चा करण्यासाठी श्री चांगदेव महाराजांचे शिष्य त्र्यंबकेश्वर येथे राहात होते. तेंव्हा पासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. सुरुवातीला ही परंपरा गुरु शिष्य परंपरेप्रमाणे चालत असे. नंतर ही परंपरा वंशपरंपरेने पुजारी म्हणून गोसावी घराण्यामध्ये आजही चालत आहे. पूर्वी संपूर्ण मंदिर व्यवस्थापन या कुटूंबीयांमार्फतच चालत असे. परंतु १९५० मध्ये धर्मादाय ट्रस्ट कायदा लागू झाल्यानंतर याचे रुपांतर ट्रस्टमध्ये करण्यात आले. २०१५ साली नविन तेरा जणांचे विश्वस्तमंडळ पाच वर्षांसाठी स्थापन झाले, त्यामध्ये नऊजण भक्तजनांमधून, तीनजण गोसावी कुटुंबीयांमधून, व एकजण त्रिंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी, असे विश्वस्थ मंडळ स्थापन झाले.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम
श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या मंदिराची दारे सकाळी ५.०० वाजता उघडली जातात. व काकडा भजनास सुरुवात होते. त्यानंतर ५.३० वाजता महाराजांना काकड आरतीने उठविले जाते. व नंतर ७.३० पर्यंत महाराजांच्या समाधिची पंचामृत अभिषेक पूजा केली जाते.
सकाळी ७.३० पासून भाविकांना समाधि जवळ जाऊन महाराजांचे दर्शन घेता येते.
यानंतर दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत महाराजांना महानैवेद्य दाखविला जातो. महानैवेद्यापर्यंत भाविकांना समाधिवर अभिषेक पूजा पुजाऱ्यां मार्फत करता येतात.
दुपारी ४.०० वाजता श्रींचा पोशाख केला जातो. रात्री ८.३० वाजता पंचपदी भजन, हरिपाठ झाल्यावर रात्री ०९.३० वाजता महाराजांची शेजारती झाल्यावर मंदिराची दारें दर्शनासाठी बंद केली जातात.
संदर्भ : संत साहित्य
संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर, संकेतस्थळ
फोटो सौजन्य : संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर, फेसबुक पेज
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी
Lord Krishna | भगवान श्रीकृष्णाच्या चमत्कारी मंत्रांचा जप करा, आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील