Shrawan 2023 : पंचतत्त्वाशी संबंधीत आहेत हे पाच शिवालय, भक्तांच्या सर्व इच्छा होतात पुर्ण

| Updated on: Jul 12, 2023 | 2:08 PM

हिंदू धर्मात, भगवान द्वादश ज्योतिर्लिंगाशी संबंधित असलेल्या मंदिरांप्रमाणे, पंचतत्त्वावर आधारित ते 5 शिवालय अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत, ज्यांच्या केवळ दर्शनाने शिव साधकाच्या सर्व इच्छा आणि प्रार्थना पूर्ण होतात.

Shrawan 2023 : पंचतत्त्वाशी संबंधीत आहेत हे पाच शिवालय, भक्तांच्या सर्व इच्छा होतात पुर्ण
श्रावण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  सनातन परंपरेत भगवान भोलेनाथांच्या भक्तीसाठी श्रावण (Shrawan 2023) महिन्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. यामुळेच या शुभ महिन्यात अनेक शिवभक्त प्रसिद्ध शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. हिंदू धर्मात, भगवान द्वादश ज्योतिर्लिंगाशी संबंधित असलेल्या मंदिरांप्रमाणे, पंचतत्त्वावर आधारित ते 5 शिवालय अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत, ज्यांच्या केवळ दर्शनाने शिव साधकाच्या सर्व इच्छा आणि प्रार्थना पूर्ण होतात. महादेवाचे जागृत स्थान मानले जाणारे हे 5 पवित्र स्थाने कुठे आहेत आणि त्यांची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊया.

एकंबरनाथ मंदिर (पृथ्वी तत्व)

पृथ्वी तत्वावर आधारित भगवान शिवाचे हे चमत्कारिक मंदिर कांचीपुरम, तामिळनाडू येथे आहे. आंब्याच्या झाडाखाली स्थापन केलेल्या या शिवलिंगाविषयी अशी श्रद्धा आहे की याच्या दर्शनाने शिवभक्तांचे सर्व दुःख आणि चिंता दूर होतात. वाळूपासून बनवलेल्या एकंबरनाथ शिवलींगाला जलाभिषेकाऐवजी पाणि शिंपडण्याची परंपरा आहे. भगवान शिवाचे हे मंदिर देशातील 10 मोठ्या मंदिरांपैकी एक आहे जे 23 एकर परिसरात आहे.

जंबुकेश्वर मंदिर (जल तत्व)

त्रिचिरापल्ली येथे असलेले जंबुकेश्वर मंदिर हे जल तत्वाचे प्रतीक मानले जाते. मंदिरातील पूजनीय शिवलिंगाची स्थानिक लोकं अप्पू लिंगम म्हणजेच जललिंग म्हणून पूजा करतात. भगवान भोलेनाथाचे हे मंदिरही सुमारे 18 एकर जागेत बांधलेले आहे. या मंदिराविषयी एक अशी श्रद्धा आहे की, एकेकाळी माता पार्वतीने येथे महादेवाचे शिवलिंग पाण्यातून बाहेर काढून पूजा केली होती.

हे सुद्धा वाचा

अरुणाचलेश्वर मंदिर (अग्नि तत्व)

तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे असलेल्या या मंदिरात भगवान शिवाची अग्नि तत्वाच्या रूपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार या मंदिरात महादेवाचे दर्शन आणि पूजा केल्याने शिवभक्ताच्या जीवनातील अंधार दूर होऊन त्याला प्रचंड ऊर्जा मिळते. अरुणाचलेश्वर मंदिरातील प्रतिष्ठित शिवलिंग सुमारे तीन फूट आहे. दक्षिण भारतातील या शिवमंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचतात.

कलाहस्तेश्वर मंदिर (हवा तत्व)

वायु तत्वावर आधारित भगवान शिवाचे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील काला हस्ती भागात आहे. शिवभक्त उंच टेकडीवर बांधलेल्या या शिव मंदिराला दक्षिणेचे कैलास म्हणतात. कलहस्तेश्वर मंदिराच्या आतील पूज्य शिवलिंगाची उंची सुमारे चार फूट आहे. या शिवलिंगाला वायु लिंग किंवा कर्पूर लिंग असेही म्हणतात. या शिवलिंगावर ना जल अर्पण केले जात ना त्याला स्पर्श केला जातो.

नटराज मंदिर (आकाश घटक)

भगवान शिवाच्या आकाश तत्वावर आधारित मंदिर तामिळनाडूच्या चिदंबरम शहरात आहे. दक्षिण भारतातील हे मंदिर थिल्लई नटराज मंदिर म्हणून ओळखले जाते, जेथे भगवान शिवाची नृत्यमूर्ती दिसते. पाच तत्वांवर आधारित मंदिरांपैकी, हे एकमेव मंदिर आहे जेथे शिव लिंगाऐवजी, मूर्ती किंवा शारीरिक स्वरूपाची पूजा केली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)