रामलल्लाला मिळालं पक्कं घर, जगाला 22 जानेवारीचीच प्रतिक्षा : पंतप्रधान नरेंद्री मोदी

| Updated on: Jan 01, 2024 | 10:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी 15 हजार कोटीहून अधिक रकमेच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. त्यांच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालं. तसेच वंदे भारत आणि अमृत भारत या एक्सप्रेसला त्यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो पार पडला. त्यानंतर त्यांनी अयोध्येताली नागरिकांना संबोधित केलं.

रामलल्लाला मिळालं पक्कं घर, जगाला 22 जानेवारीचीच प्रतिक्षा : पंतप्रधान नरेंद्री मोदी
Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : एककाळ होता. याच अयोध्येत रामलल्ला तंबूत विराजमान होते. आज रामलल्लाला पक्कं घर मिळालं. केवळ रामलल्लालाच नव्हे तर देशातील चार कोटी गरीबांना घर मिळालं आहे, असं सांगतानाच जगातील कोणत्याही देशाला विकासाची उंची गाठायची असेल तर त्यांना आपला वारसा जपलाच पाहिजे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. वंदे भारत आणि अमृत भारत या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. यावेळी मोदी यांचा मेगा रोड शो पार पडला. त्यानंतर त्यांनी अयोध्येताली नागरिकांना संबोधित केलं.

येत्या 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची जगाला प्रतिक्षा आहे. अयोध्यातील जनतेचा उत्साह स्वाभाविक आहे. 22 जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करा. घरा घरात दिवे लावून घर उजळून टाका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मी भारताच्या मातीतील कणाकणाचा आणि जनसामान्यांचा पुजारी आहे. मीही तुमच्या सारखाच 22 तारखेची वाट पाहत आहे. मीही रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आतूर झालो आहे. आपल्या सर्वांचा उत्साह मला अयोध्येच्या रस्त्यावर दिसून येत आहे. संपूर्ण जगच अयोध्येत आवतरलं की काय असं वाटतंय. तुम्ही जे प्रेम दाखवलं आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सियावर राम चंद्र की जय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सियावर राम चंद्र की जय…च्या तीनवेळा घोषणाही दिल्या. माझ्यासाठी 30 डिसेंबरची तारीखही ऐतिहासिक आहे. कारण 1940 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानात झेंडा फडकवून भारताचा जयघोष केला होता. स्वातंत्र्याच्या पवित्र काळापासून आपण अमृत काळापर्यंत आलो आहोत. अयोध्येत नवी ऊर्जा मिळत आहे. 15 हजार कोटीहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येत आहे. भूमीपूजन झालं आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

आपल्याला प्रभू रामाचा सहवास मिळेल

यावेळी त्यांनी अयोध्या विमानतळाचाही उल्लेख केला. त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने विमानतळ उभारण्यात आलं आहे. त्यामुळे या विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला कृतज्ञ झाल्यासारखं वाटेल. महर्षि वाल्मिकी यांनी रचलेलं रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे. हा ज्ञानाचा मार्ग आपल्याला प्रभू श्री रामाशी नेऊन जोडतो. आधुनिक भारतात महर्षि वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अयोध्या धाम आपल्याला भव्यदिव्य राम मंदिराशी कनेक्ट करेल, असंही ते म्हणाले.