हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिपूर्वक पूजा केली जाते. उत्पत्ती एकादशीचे व्रत मार्गशीष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी या दिवशी केले जाते.
पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णूंची पूजा करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख-समृद्धी राहते.
कधी आहे उत्पत्ती एकादशी?
मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०१ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:४७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
आर्थिक संकट आणि कर्जापासून मुक्ती मिळवणयासाठी उपाय
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा. देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसा आणि एक माळ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर भगवान विष्णूला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा.
रोगमुक्तीसाठी उपाय
या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी एकत्रित करून अर्पण करा. पूर्ण २१ दिवस हे नित्यनेमाने करायचे आहे. पिंपळाच्या मुळाची थोडी ओलीमाती घेऊन ती कपाळावर आणि नाभीला लावा. या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूची आराधना करा.
लवकर विवाह होण्यासाठी उपाय
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. शाळीग्रामला आंघोळ घालून त्याला चंदन लावून घ्या. शालिग्रामला एका पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवा. त्यानंतर तुळशीला शाळीग्राम समर्पित करा. यानंतर आपला विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करा.
एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्
ॐ विष्णवे नम:
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)