अहमदाबाद, दि. 19 नोव्हेंबर | वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आज अहमदाबामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास खेळाडूंना भरभरुन रक्कम मिळणार आहे. अगदी ‘छप्परफाड के’ रक्कम मिळणार आहे. परंतु यापूर्वी 1983 मध्ये अशी परिस्थिती नव्हती. 1983 मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजय मिळवला. त्यावेळी खेळाडूंना एक-एक लाख रुपये देण्यासाठी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम घ्यावा लागला होता.
1983 च्या संघातील यष्टीरक्षक सय्यद किरमानी याने एका मुलाखतीत म्हटले होती की, आम्हाला दैनंदिन भत्ता रोज 50 पाउंड मिळत होता. ही रक्कम दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि कपडे धुण्यासाठी वापरत होतो. संपूर्ण दौऱ्यात बोनस म्हणून 15,000 मिळाले होते. ही रक्कम विश्वकरंडक जिंकून भारतात आल्यानंतर मिळाली.
2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली टीमने वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी भारतीय खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस पाडला गेला. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस दोन-दोन कोटी रुपये बीसीसीआयने दिले. तसेच विविध राज्य सरकारकडून बक्षिसांची खैरात वाटली गेली. अनेक कंपन्यांनी खेळाडूंना पुरस्कार दिले. 2011 मध्ये वर्ल्डकपमधील प्राइज मनी 66 कोटी होती. त्यातील 25 कोटी विजेत्या संघाला भारताला दिले गेले. उपविजेत्या श्रीलंका संघाला 12 कोटी दिले.
2023 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला आर्धी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रक्कमेची घोषणा नंतर होणार आहे. 1983 मध्ये लता मंगेशकर यांनी भारतीय संघासाठी केलेल्या कार्यक्रमानंतर बीसीसीआयने प्रत्येक सामन्यात एक जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवली होती. लता दीदींनी भारतीय टीमसाठी दिलेल्या योगदानाची परतफेड करण्याचा हा छोटा प्रयत्न होता. त्यावेळी लतात दीदी यांनी गायलेल्या गाण्याची चांगली चर्चा झाली. या कार्यक्रमातून 20 लाख रुपयांची कमाई झाली होती.