Anil Kumble : विराटबद्दल जे बोललाच नाही, त्यावरुन कुंबळेला द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Dec 17, 2024 | 9:19 AM

Anil Kumble : ब्रिसबेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली लवकर आऊट झाला. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका सुरु आहे. सुनील गावस्कर, चेतेश्वर पुजारासह अनेक दिग्गजांनी यावरुन विराटवर टीका केलीय. यात आता अनिल कुंबळेच नाव समोर आलय.

Anil Kumble : विराटबद्दल जे बोललाच नाही, त्यावरुन कुंबळेला द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Virat Kohli-Anil Kumble
Image Credit source: PTI/X
Follow us on

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अजूनपर्यंत तरी विराट कोहली विशेष कमाल दाखवू शकलेला नाही. पर्थ टेस्टमध्ये एक शतक सोडल्यास प्रत्येक इनिंगमध्ये विराट अपयशी ठरला आहे. त्यामुळे विराट कोहलीवर सध्या चौफेर टीका सुरु आहे. त्याच्या संदर्भात अनेक वक्तव्य केली जात आहेत. विराट कोहली संदर्भात अशाच एका वक्तव्यावरुन वाद सुरु आहे. त्यावरुन टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

ब्रिसबेनमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सुद्धा टीम इंडियाने खराब फलंदाजी केली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली फक्त 4 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह खेळण्याच्या प्रयत्नात फक्त 3 रन्सवर आऊट झाला. सुनील गावस्कर, चेतेश्वर पुजारासह अनेक दिग्गजांनी यावरुन विराटवर टीका केलीय.

काय आहे या व्हायरल पोस्टमध्ये?

ही टीका सुरु असताना माजी दिग्गज लेग स्पिनर आणि भारतीय टीमचा माजी हेड कोच अनिल कुंबळेचं एक वक्तव्य चर्चेत आलं. सोशल मीडियावर अनिल कुंबळेच्या नावाने हे वक्तव्य व्हायरल होत आहे. यात विराट कोहलीवर टीका करण्यात आलीय. एका सोशल मीडिया पोस्टनुसार कुंबळेने मागच्या पाच वर्षांपासूनच्या विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न निर्माण केले. क्रिकेट सोडून त्याने कायमसाठी लंडनला स्थायिक व्हावं असं सुद्धा या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.


सत्य काय?

अनिल कुंबळे सारख्या दिग्गजाच्या नावाने अशी पोस्ट व्हायरल झाली, तर त्यावरुन वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण, सत्य हे आहे की, कुंबळेने असं कोणतही स्टेटमेंट केलेलं नाही. त्याच्या नावाने खोटी पोस्ट करण्यात आली आहे. ही गोष्ट कुंबळेच्या लक्षात आल्यानंतर त्याने स्पष्टीकरण दिलय.


अनिल कुंबळे काय म्हणाला?

कुंबळेने सांगितलं की, त्याचं नाव आणि फोटो वापरुन अनेक सोशल मीडिया अकाऊंटसवरुन खोटी स्टेटमेंट पोस्ट केली जात आहेत” कुंबळे म्हणाला की, “मी स्पष्टपणे सांगतो की, कुठल्या अकाऊंटशी माझा संबंध नाही. जे वक्तव्य पसरवली जातायत, त्याच्याशी माझं काही देणं-घेणं नाही. हे माझे विचार नाहीत” अनिल कुंबळेने फॅन्सना सर्तक रहाण्याच आणि स्टेटमेंट तपासून घेण्याचा सल्ला दिला आहे.