औरंगाबाद: 60 व्या राष्ट्रीय अॅथेलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादचा उत्कृष्ट धावपटू तेजस शिर्सेने अजिंक्यपद पटकावले आहे. कर्नाटक येथील वारंगळमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत तेजसने शिर्से याने 110 मीटर हर्डल्स गटात सोनेरी यशाचा पल्ला गाठला. त्याने अवघ्या 14.09 सेकंदात पार केले आणि या स्पर्धेत तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
तेजस सध्या फक्त 19 वर्षांचा आहे. पदार्पणातच त्याने सीनियर गटातील सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करून आपल्यातील चुणूक दाखवून दिली आहे. कर्नाटकातील वारंगळ येथील 110 मीचर हर्डल्स गटात तेजसने पहिला क्रमांक पटकावला. स्पर्धेत त्याने सर्व्हिसच्या सचिन बानू आणि तरुणदीप भाटियाला मागे टाकत प्रथम क्रमांकावर बाजी मारली. त्यामुळे सचिनला रौप्य पदक मिळाले तर तरुणदीपला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तेजसने काही दिवसांपूर्वीच 19 व्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे वर्ल्ड चँपियनशिपमध्ये त्याला भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची स्ंधी मिळाली होती. तेथेही त्याने उत्तम कामगिरी केली होती. आता 45 दिवसांनीच वारंगळ येथील स्पर्धेत त्याने सुवर्णपद काबीज केले. त्यामुळे औरंगाबादच्या क्रीडाप्रेमी वर्तुळाकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मागील वर्षी तेजस शिर्से हा विजयवाडा येथील 35 व्या ज्युनियर राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुषांच्या 18 वर्षांखालील 110 मीटरच्या अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 13.59 सेकंदांमध्ये निश्चित अंतर गाठून अव्वलस्थानी धडक मारली.
तेजस हा अत्यंत कष्टाळू धावपटू असून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तो भविष्यात निश्चितच यशस्वी हेईल, अशी मला खात्री आहे. मात्र अजूनही असे गुणवंत खेळाडू घडण्याकरिता शहरात आवश्यक त्या सोयी-सुविधा नाहीत. शहरात सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे अनेक खेळाडूंना सराव करणे कठीण जाते. शहरात लवकराच लवकर सिंथेटिक ट्रॅक तयार झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया तेजसचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी दिली.
इतर बातम्या-
विराट कोहलीवरच ‘गेम’ उलटला, रोहित शर्माला उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्लॅन फसला?