मुंबई: यूनिकॉर्न बायजूज (Byju’s) यावर्षी कतरमध्ये आयोजित होणाऱ्या फीफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची (Fifa World Cup) अधिकृत स्पॉन्सर बनली आहे. बायजूजला आता फीफा वर्ल्ड कपचा लोगो आणि अन्य संपत्तीचा वापर करत जगभरातील फुटबॉल (Football) प्रेमींमध्ये प्रचार करता येईल. या करारातंर्गत बायजूजला युवा चाहत्यांना शिक्षणाशी संबंधित कंटेट सादर करता येईल. फीफा फुटबॉलची जी शक्ती आहे, त्याचा वापर करुन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पित आहे, असे फीफाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी Kay Madati म्हणाले. बायूज सारख्या कंपनीसोबत करार करुन आम्ही आनंदी आहोत. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा यंदा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
ही माझ्यासाठी अभिमानाची बाब : बायजू रवींद्रन
“फीफा वर्ल्ड कप 2022 ला स्पॉन्सर करुन मी खूप आनंदी आहे. हा जगातील एक मोठा स्पोर्ट इव्हेंट आहे. भारताला मी इतक्या मोठ्या प्रतिष्ठीत मंचावर सादर करणार आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे” असे कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ बायजू रवींद्रन म्हणाले. “खेळ आयुष्याचा एक मोठा भाग आहे. जगभरातील लोकांना खेळ एकत्रित आणतो. फुटबॉल कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतो. बायजूज या पार्टनरशिपमधून मुलांच्या आयुष्यात शिकण्यासाठी प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल” असे बायजू म्हणाले.
कोण आहेत बायजू रवींद्रन?
39 वर्षाच्या बायजू रवींद्रन यांनी यूनिकॉर्न बायजूज कंपनीची स्थापना केली. रवींद्रन यांचा जन्म दक्षिण भारतात झाल आहे. रवींद्रन यांनी आधी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी इतर मुलांची मदत करायला सुरुवात केली. ते मुलांना शिकवायचे, ती पद्धत मुलांना भरपूर आवडायची. त्यानंतर बायजू रवींद्रन यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. एक प्रसिद्ध शिक्षक म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी मोठ्या ऑडिटोरियममध्ये वर्ग घ्यायला सुरुवात केली.