मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल खेळणार आहे. मात्र या मॅच आधी भारतीय संघाला एक झटका बसला आहे. टीमचा मुख्य खेळाडू फायनल आधी बाहेर गेला आहे. भारतीय टीमचा स्टार खेळाडू मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुवर्णपदकाच्या सामन्यात खेळणार नाही. या महत्त्वाच्या सामन्याआधी त्याला दुखापत झाली आहे. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय हॉकी टीमकडे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय हॉकी संघ कधीच कॉमनवेल्थ मध्ये कधीच गोल्ड मेडल जिंकू शकलेला नाही. हॉकी संघाला फक्त दोन रौप्यपदक मिळवता आली आहेत. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियानेच भारताचा पराभव केला होता.
भारतीय पुरुष हॉकी संघ 2010 आणि 2014 मध्ये कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचला होता. दोन्हीवेळा ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केलं. यावेळी सुद्धा भारतासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. यावेळी गोल्ड मेडल जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलिया एक बलाढ्य संघ आहे. त्यांनी आतापर्यंत 6 कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. 1998 साली हॉकीचा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये समावेश करण्यात आला. प्रत्येकवेळी चॅम्पिशिपचा किताब ऑस्ट्रेलियानेच जिंकला.