मुंबई: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणि इंग्लंड मधला हॉकी सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या काही मिनिटात भारतीय हॉकी संघ गडबडतोय, यावर मात करण्यासाठी भारतीय हॉकी संघाला एक्सपर्टची मदत घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटच्या काही मिनिटात सामन्यावरील पकड सैल होणं आणि आपल्या गोलपोस्ट जवळ चुका केल्याने महत्त्वाची मेडल्स हातून निसटतायत. टोक्यो ऑलिम्पिक आणि यावर्षी आशिया कप मध्ये हे घडलय. इंग्लंड विरुद्ध चौथ्या क्वार्टर मध्ये शेवटच्या 15 मिनिटांचा खेळ पाहिल्यानंतर, सुधारणा झाली नाही, तर राष्ट्रकुल मध्येही त्याच चुकांची पुनरावृत्ती होऊ शकते.
इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या क्वार्टर मध्ये टीम इंडियाकडे 3-1 अशी आघाडी होती. पण सामना संपल 4-4 असा बरोबरीत. शेवटच्या क्वार्टर मध्ये टीम इंडियाला फक्त 9 खेळाडूनिशी खेळावं लागलं. शेवटच्या काही मिनिटात भारताची सामन्यावरील पकड सैल झाली होती. गुरजंत सिंह धोकादायक पद्धतीने खेळत असल्याने 10 मिनिटं त्याला बाहेर बसवण्यात आलं. मोठ्या स्पर्धेतील सामवन्यात महत्त्वाच्या क्षणी अशा चुका कशा परवडू शकतात? याचं उत्तर संघ व्यवस्थानपाला शोधावं लागेल. कारण पहिल्यांदा होत नाहीय. चांगली बाब म्हणजे हा फक्त साखळी फेरीतील सामना होता. संघाकडे स्वत:ला सावरण्याची संधी होती.
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलं. पण त्यावेळी सुद्धा झालेल्या काही चुकांमुळे पदकाचा रंग बदलला. सेमीफायनल मध्ये बेल्जियम विरुद्ध तिसऱ्या क्वार्टर मध्ये भारतीय हॉकी संघ 2-2 असा बरोबरीत होता. भारतीय संघ सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकेल असं वाटत होतं. पण शेवटच्या टप्प्यात बचाव इतका कमकुवत झाला की, बेल्जियमने 49, 53 आणि 60 व्या मिनिटाला गोल करुन सामन्याचा नूरच पालटला. यात दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. जर्मनी विरुद्ध जिंकून भारताने कांस्य पदक मिळवलं. पण त्यावेळी सुद्धा शेवटच्या काही मिनिटात टीम इंडिया गडबडली होती. तीसरा क्वार्टर मध्ये भारतीय संघ 5-3 असा आघाडीवर होता. भारतीय टीमने 48 व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर दिला. त्यामुळे सामना 5-4 असा संपला.