मुंबई: बर्मिंघम मध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये शनिवारचा दिवस भारतासाठी शानदार होता. काल भारताने चार पदकं मिळवली. ही चारही मेडल्स वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली. याची सुरुवात संकेत महादेवने केली. मीराबाई चानू गुरुराजा आणि त्यानंतर बिंदियारानीने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली. बिंदियारानी इथवर पोहोचली, त्यात काही योगदान टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचही आहे. बिंदियारानीचं 55 किलो वजनी गटात फक्त एक किलोच्या फरकाने सुवर्णपदक हुकलं.
बिंदियारानी आणि मीराबाई मध्ये बऱ्याच समानता आहेत. या दोन्ही खेळाडू इशान्य भारतातून मणिपूर मधून येतात. याशिवाय या दोघी एकाच अकादमीत सराव करतात. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा जवळपास सारखीच आहे. अनेक बाबतीत बिंदियारानी मीराबाई चानू सारखीच आहे. म्हणूनच अनेकांनी बिंदियारानीच नाव मीराबाई चानू 2.0 ठेवलं आहे. मीराबाई चानूने ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकल नव्हतं, तेव्हाची ही गोष्ट आहे.
बिंदियारानी देवी मीराबाई चानूलाच पाहूनच मोठी झाली आहे. जेव्हा मीराबाई चानूला बिंदियारानीच्या संघर्षाबद्दल कळलं, तेव्हा तिने मदतीचा हात पुढे केला होता. बिंदियारानीकडे चांगले बूट नाहीत, हे मीराबाई चानूला समजलं, तेव्हा तिने आपले बूट बिंदियारानीला भेट म्हणून दिले. द ब्रिजने आपल्या बातमीत ही माहिती दिलीय.
बिंदियारानीने मागच्यावर्षी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर ती म्हणाली होती की, “मीरा ताईचं माझ्या यशामध्ये योगदान आहे. माझी टेक्निक आणि ट्रेनिंगच्या बाबतीत ती नेहमीच मदतीसाठी तयार असते. माझ्याकडे बूट विकत घेण्याचे पैसे नाहीत, हे तिला माहित होतं. तिने जराही मागचा पुढचा विचार न करता तिचे बूट मला दिले. ती नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिली आहे. तिचे पाय जमिनीवरच आहेत. त्यामुळे मी तिची सर्वात मोठी चाहती आहे”
बिंदियारानीची ही पहिली कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने पदक विजेती कामगिरी केली. बिंदियारानीने स्नॅच मध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात तिने 81 किलो वजन उचललं. पुढच्या दोन प्रयत्नात 84 आणि 86 किलो वजन उचललं. क्लीन अँड जर्क मध्ये तिने 110 किलो वजनासह चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. पण तरीही बिंदियारानी देवीने हार मानली नाही. तिने ठरवून 116 किलो वजन उचललं.