मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानी संघात मोठी धुसफूस सुरु झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमद प्रचंड नाराज आहे. सरफराजने पाकिस्तानी टीममधील काही खेळाडूंवर आपला संताप व्यक्त करत, गटबाजीचा आरोपही केला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर सरफराज अहमद ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि तिथे उपस्थित पाकिस्तानी खेळाडूंवर संतापला. वहाब रियाज, इमाम-उल-हक, बाबर आजम आणि इमाद वसीम यांच्यावर सरफराज अहमदने गटबाजीचा आरोप केला. सरफराज अहमदने वसीमला तर पाकिस्तानी संघातील गटबाजीचा ‘सरदार’ म्हटलं.
सरफराज म्हणाला, पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनण्यावरच इमादचं लक्ष आहे. या आरोपानंतर ड्रेसिंग रुममध्येच पाकिस्तानी संघात घमासान उडालं.
पाकिस्तानी संघातील ऑलराऊंडर शोएब मलिक हा सुद्धा सरफराज आरोप करत असलेल्या गटाचं समर्थन करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्ल्डकप संपल्यानंतर शोएब मलिक निवृत्त होणार आहे. त्यानेच तशी घोषणा केली आहे.
भारताविरोधात खेळताना पाकिस्तानी संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यावरुन सरफराजने संघातील खेळाडूंना प्रचंड सुनावलं. यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर अगदी शांत बसले होते. मात्र, थोड्या वेळाने मिकी आर्थर केवळ क्रिकेटशी संबंधित विषयांवर बोलले. खेळाडूंनी नीट कामगिरी केली असती, तर भारताविरोधात जिंकणं शक्य होतं, असे सरफराजचे मत होते.
भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्याने पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते आहे. पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांकडून तर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका केली जात आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आतापर्यंत पाच सामने खेळला असून, गुणतालिकेत पाकिस्तानकडे केवळ 3 गुण आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पोहोचणं सुद्धा अशक्य होऊन बसलं आहे.