ढाका: बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या मागे दुखापतीचा ससेमिरा लागलाय. आज एकाच दिवसात तीन खेळाडूंना दुखापत झाली. रोहित शर्मा स्लीपमध्ये फिल्डिंग करत असताना चेंडू बोटाला लागून दुखापत झाली. बोटातून रक्त आल्याने त्याला रुग्णालयात जावं लागलं. रोहित त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकला नाही. कुलदीप सेनही दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळू शकला नाही.
त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही
दीपक चाहर मैदानात उतरला होता. त्याने तीन ओव्हर्स गोलंदाजी केली. त्याने तीन षटकात 12 धावा दिल्या होत्या. पण हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. परिणामी एक गोलंदाज कमी झाल्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्याच्या कोट्याची षटकं अक्षर पटेलला पूर्ण करावी लागली.
दीपक चाहरची जागा कोण घेणार?
दीपक चाहर तिसऱ्या वनडेत खेळण्याची शक्यता कमी आहे. आता त्याच्याजागी कोणाला बोलवायच? यासाठी बीसीसीआयकडेही कमी पर्याय आहेत. उमेश यादव चाहरची जागा घेऊ शकतो. सध्या तो बांग्लादेशमध्ये आहे. इंडिया ‘ए’ कडून तो खेळतोय. दुसरा पर्याय मध्य प्रदेशचा गोलंदाज आवेश खानचा आहे. त्याने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 6 सामन्यात 12 विकेट घेतल्यात. तिसरा पर्याय नवदीप सैनीचा आहे. तो सुद्धा बांग्लादेशमध्ये असून इंडिया ‘ए’ कडून खेळतोय.