मुंबई : सध्या क्रिकेट विश्वात चर्चा आहे ती फक्त आणि फक्त रोहित शर्माची. कारण रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कॅप्टन झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाची इथून पुढील वाटाचाल होणार आहे. रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर त्याच्याबद्दल रोज नवी माहिती समोर येऊ लागली आहे. रोहित शर्माला आयपीएलमधील प्रदीर्घ कर्णधारपणाचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वात टीमने भरघोस यश मिळवले आहे. मात्र रोहितच्या नेतृत्वाची क्षमता पहिल्यांदा कुणी ओळखली? याबद्दल एका खेळाडूने खुलासा केला आहे.
एडम गिलख्रस्टने केलेली रोहितची पारख
ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर आणि स्फोटक फलंदाज एडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वात डेक्कन चार्जेस ही टीम आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत होती. त्यावेळी रोहित शर्माही त्याच टीमसाठी खेळत होता. ज्यावेळी टीम मिटिंग व्हायची त्यावेळी रोहित शर्मा टीमला जिंकवण्यासाठी भन्नाट प्लॅनिंग सांगताना दिसून यायचा. त्याला तेव्हापासूनच कोणत्या खेळाडूची काय ताकद आहे. काय कमी आहे. सर्व सहज कळत होते. तेव्हा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून केवळ दोन वर्षे झाली होती. तरी त्याचा गेम प्लॅन खूप चांगला होता. असा खुलासा प्रग्यान ओझ्याने केला आहे. त्यानंतर एडम गिलख्रिस्टने रोहितला टीमचा उपकर्णधारही बनवले होते. गिलख्रिस्टला रोहित उत्तम नेतृत्व करू शकतो हे चांगलेच माहित होते.
मुंबईचा कॅप्टन झाल्यापासून रोहितची गाडी सुसाट
मुंबई इंडियन्सची टीम रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात काही खास कामगिरी करू शकली नव्हती. सचिन तेंडुलकर आणि रिकी ओपनिंगला उतरताना पाहणे कित्येक चाहत्यांचे स्वप्न जणू सत्यात उतरले होते. मात्र तरीही टीमला काही खास यश मिळत नव्हते. त्यामुळे मुंबई इंडियन्स नव्या कर्णधाराच्या शोधात होती. त्यानंतर रिकीने पायउतार होत, रोहितला कर्णधार बनवले आणि रोहितची गाडी तिथून सुसाट निघाली. त्याने मुंबईला सर्वात जास्त म्हणजे 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या. असेच यश रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाला मिळावे हीच अपेक्षा आहे.