नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये मंगळवारी तिसरा टी 20 सामना झाला. पावसामुळे ही मॅच पूर्ण होऊ शकली नाही. डकवर्थ लुइस नियमाच्या आधारे हा सामना टाय झाला. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला होता. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे टीम इंडियाने ही सीरीज 1-0 ने जिंकली. या सीरीज विजयासह भारताने एक नवीन इतिहास रचला आहे.
याआधी शक्य झालं नव्हतं
न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकून टीम इंडियाने SENA देशांविरुद्ध म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकाच कॅलेंडर वर्षात टी 20 सीरीज जिंकण्यात पहिल्यांदा यश मिळवलय. याआधी भारताने एकाच कॅलेंडर वर्षात या देशांविरुद्ध कधीही सीरीज जिंकली नव्हती.
इंग्रजांविरुद्ध मालिका विजय
टीम इंडिया यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी भारत इंग्रजांविरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज खेळला. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
भारताने कुठे विजय मिळवले?
ऑस्ट्रेलियन टीम सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. तीन टी 20 सामन्यांची सीरीज झाली. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने भारताचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकन टीमने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळली. भारताने ही सीरीज 2-1 अशी जिंकली. भारतीय टीमने आता न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 असा विजय मिळवलाय.