फुटबॉलच्या खेळात नेहमी एक वाक्य बोललं जातं. ‘स्ट्राइकर तुम्हाला मॅच जिंकवतो, पण डिफेंडर तुम्हाला चॅम्पियन बनवतो’. क्रिकेटमध्ये सुद्धा असच काहीस आहे. ‘फलंदाज तुम्हाला मॅच जिंकवतात, पण गोलंदाज तुम्हाला चॅम्पियनशिप मिळवून देतात’ आयपीएलमध्ये चांगला बॉलिंग अटॅक असलेल्या टीम यशस्वी ठरल्या आहेत. त्याचवेळी काही टीम यशस्वी ठरु शकल्या नाहीत. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एक टीम आहे. लीगच्या 17 व्या सीजनमध्ये सुद्धा RCB किताब जिंकण्यात अयशस्वी ठरली. आता या टीमच्या कोचने जे म्हटलय, तीच गोष्ट अनेक दिग्गज अनेक वर्षांपासून बोलतायत.
आयपीएल 2024 च्या सीजनची सुरुवात बंगळुरुसाठी खराब झाली. टीमने 8 पैकी 7 सामने हरले होते. त्यानंतर सलग 6 सामने जिंकून जोरदार पुनरागमन केलं. प्लेऑफमध्ये प्रवेश केला. इथे एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना 4 विकेटने हरवलं. त्यामुळे स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. सलग 17 व्या सीजनमध्ये RCB किताबापासून वंचित झाली. टुर्नामेंट सुरु होण्याआधीपासून आरसीबीकडे गोलंदाजांची जी फळी होती, त्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
अँडी फ्लॉवर यांच्याकडून कसली कबुली?
टुर्नामेंट सुरु झाल्यानंतर RCB च्या गोलंदाजीतील कमतरता स्पष्टपणे दिसू लागली. दुसऱ्या हाफमध्ये गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. पण, तरीही विश्वास ठेवावा, अशी गोलंदाजांची फळी नव्हती. खासकरुन होमग्राऊंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बॉलिंग RCB साठी डोकेदुखी ठरली. होमग्राऊंडचा फायदा उचलता आला पाहिजे, त्यासाठी समजदार गोलंदाजांची गरज आहे हे राजस्थान विरुद्ध पराभवानंतर टीमचे कोच अँडी फ्लॉवर यांनी कबूल केलं.
अँडी फ्लॉवर यांनी स्पष्टपणे काय म्हटलं?
“चिन्नास्वामी स्टेडियमवर यश मिळवण्यासाठी फक्त वेगाची नाही, तर योग्य कौशल्य असलेल्या गोलंदाजांची गरज आहे” असं फ्लॉवर मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. “चिन्नास्वामी स्टेडियमच्या गरजेनुसार जी योजना बनवण्यात आलीय, ती प्रत्यक्षात आणू शकतील अशा डोकं असलेल्या कुशल गोलंदाजांची गरज आहे” असं RCB कोचने स्पष्टपणे म्हटलं. जे धावांची लय कायम ठेवतील अशा ताकदवान फलंदाजांची गरज असल्याचही त्यांनी मान्य केलं.