29 जूनला बार्बाडोसमध्ये हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकताच संपूर्ण देशामध्ये एकाच आंनदोत्सव सुरु झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं. अनेक वर्षांपासूनची वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा संपुष्टात आली. फॅन्स वर्ल्ड कप विजयाच्या आनंदात होते, त्याचवेळी त्यांना एक धक्का बसला. फायनलचा हिरो आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने T20 च्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. काही वेळाने रोहित शर्माने सुद्धा हेच पाऊल उचललं. त्यानंतर T20 मध्ये रोहित-विराटची जागा कोण घेणार? ही चर्चा सुरु झाली. आता टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने त्या स्थानासाठी दावा केलाय.
सध्या सगळ्या देशात टीम इंडियाच्या खेळाडूंच ठिकठिकाणी स्वागत होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा टीम झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. शनिवार 6 जुलैपासून T20 सीरीज सुरु होत आहे. शुभमन गिलला झिम्बाब्ने टूरच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅप्टनशिपची संधी मिळाली आहे. 5 मॅचच्या या सीरीज दरम्यान गिलला अनेक कठीण प्रश्नांची सुद्धा उत्तर द्यावी लागतील.
एक कठीण प्रश्न विचारण्यात आला
शुभमन गिलला त्याच्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये एक कठीण प्रश्न विचारण्यात आला. टीम इंडियाकडून ओपनिंगच्या रोल संदर्भात हा प्रश्न होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 मधून निवृत्ती घेतल्यामुळे ओपनिंग कोण करणार? हा प्रश्न आहे. गिलने या पोजिशनवर दावा केला. रोहित आणि कोहलीचा उल्लेख करुन गिल म्हणाला की, “दोघांनी वर्ल्ड कप दरम्यान ओपनिंग केली. मी स्वत: ओपनिंग करतो. त्यामुळे पुढेही T20 मध्ये मला ओपन करायला आवडेल”
दुसऱ्या स्पॉटसाठी स्पर्धा
रोहित टीम इंडियासाठी नेहमीच ओपनिंग करतो. कोहली वर्ल्ड कप दरम्यान ओपनरच्या रोलमध्ये होता. T20 मध्ये ओपनिंगचा स्लॉट रिकामी झालाय. एका जागेवर यशस्वी जैस्वाल खेळणार हे निश्चित आहे. दुसऱ्या स्पॉटसाठी स्पर्धा आहे. गिलला ही पोजिशन हवी आहे. झिम्बाब्वे सीरीजमध्ये गिलच ओपनिंग करेल. तिथे अभिषेक शर्मा त्याच्यासोबत ओपनिंगला येईल.